पुणे - राज्यातील व्यवस्थापन शास्त्रा (एमबीए) च्या प्रवेश परीक्षेचा निकाल लागून शंभर दिवस झाले आहेत. तरी देखील शासनाने अद्याप प्रवेश प्रक्रिया सुरू केलेली नाही. ही प्रवेशप्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे(अभाविप)च्यावतीने पुण्यातील तंत्रशिक्षण सहसंचालकांच्या विभागीय कार्यालयाबाहेर 'ढोल बजाओ' आंदोलन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ -
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी सरकारला जागे करण्यासाठी अभाविपवर आंदोलन करण्याची वेळ आली. एमबीए, लॉ, बीएड अशा वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचे लाखो विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेकडे डोळे लावून बसले आहेत. देशातील इतर राज्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. काही ठिकाणी तर वर्गही सुरू झाले आहेत. मात्र, महाराष्ट्र सरकारने अद्याप प्रवेशप्रक्रियाही सुरू केलेली नाही. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचे काम महाविकास आघाडी सरकारकडून सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने लवकरात लवकर प्रवेश प्रक्रिया सुरू करावी. असे न झाल्यास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने आणखी तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल, असा इशार संघटनेचे पदाधिकारी अनिल ठोंबरे यांनी दिला.
हेही वाचा - मराठा आरक्षणाच्या निकालामुळे अनेक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया लांबणीवर
मराठा आरक्षणामुळे प्रवेशप्रक्रियेला विलंब -
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यावर तोडगा निघूपर्यंच प्रवेशप्रक्रिया सुरळीत होण्याची शक्यता कमी असल्याचे शिक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याचा अभाविपने विरोध केला आहे. काही अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचा निकाल आरक्षणाला स्थगिती मिळण्याच्या अगोदरच लागला होता. तरीही शासनाने काही कार्यवाही सुरू केली नव्हती, असे अभाविपचे म्हणणे आहे.