बारामती - बारामती एमआयडीसीतील एका बंद पडलेल्या कंपनीच्या इमारतीमध्ये स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलेकडून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या, दिपक अर्जून नाळे (वय 45, रा. डोर्लेवाडी, ता. बारामती) याच्या विरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला.
या प्रकरणी पोलीस कर्मचारी विनोद लोखंडे यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (दि. 29) रोजी ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना याप्रकरणाची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी बनावट ग्राहकाकडे दोन हजार रुपये देऊन, त्याला घटनास्थळी पाठवले. बनावट ग्राहक बोलणी करत असताना पोलिसांनी छापा टाकून दिपक नाळे याला अटक केली. दरम्यान त्याच्यासोबत असलेल्या महिलेने पैशाचे आमिष दाखवून आपल्याला याठिकाणी वेश्या व्यवसायासाठी आणल्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावरून सात हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे.