पुणे - कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबरोबर सर्वसामान्य लोकांचे हालही वाढत आहेत. कोरोना रुग्णाला खासगी रुग्णालयामध्ये किमान 30 ते 50 हजार रुपये डिपॉझिट शिवाय प्रवेशच मिळत नाही, तर काही खासगी रुग्णालयामध्ये दाखल असलेल्या रुग्णाला रुग्णालयातच कोरोनाची लागण झाल्यावर डिपॉझिट केल्याशिवाय कोविड रुग्णालयामध्ये शिफ्ट करून घेतले जात नसल्याचे समोर आले आहे. तसेच 30 हजार रुपये डिपॉझिट आणि दिवसाला पाच ते सहा रुपये खर्च लक्षात ठेवून तीन ते साडेतीन लाखांची तयारी ठेवण्याचा सल्ला आग्रहपूर्वक खासगी रुग्णालय कोरोना रुग्णाच्या नातेवाइकांना देत आहे.
सध्या पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहे. अश्या या परिस्थितीत सरकारी रुग्णालयातील बेड भरले आहेत. सर्वसामान्य नागरिकाने खासगी रुग्णालयात धाव घेतल्यानंतर खासगी रुग्णालयांमार्फत मनमानी करण्यात येत आहे. रुग्णांना सर्वप्रथम डिपॉझिट भरा आणि मगच रुग्णायात प्रवेश करा, अशी परिस्थिती आहे. मग राजकीय व्यक्ती किंवा सामाजिक संस्था यांच्या हस्तक्षेपाशिवाय रुग्णांना अॅडमिट केले जात नाही. या सर्व परिस्थितीचा सर्वसामान्य नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
खासगी रुग्णालयांच्या या आडमुठेपणामुळे दररोज 5 ते 10 रुग्णांना दाखल करण्यापासून ते शेवटच्या बिलापर्यंत गेल्या 4 महिन्यांमध्ये कोणत्या न कोणत्या खासगी रुग्णालयात जाऊन मनसे स्टाईलने वादविवाद करावा लागत आहे. यामुळे सरकारने आणि प्रशासनाने फक्त बोलून नाही तर प्रत्यक्ष अशा खासगी रुग्णालयांवर कारवाई करावी, अशी मागणी मनसे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी केली आहे.
गेल्या आठ्वड्याभरापासून पिंपरीतील डी. वाय. पाटील रुग्णालयात माझी मुलगी मेंदूच्या त्रासामुळे अतिदक्षता विभागात दाखल असताना अचानक तिला ताप आला. डॉक्टरांकडून तिला कोरोना चाचणी करण्यासाठी सांगण्यात आले. यानंतर दुसऱ्या दिवशी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर लगेच रुग्णालय प्रशासनाकडून 30 हजार डिपॉझिट भरण्यासाठी सांगण्यात आले. पैसे भरण्यासाठी वारंवार तगादा लावण्यात आला. मात्र, पैसे नसल्याने रुग्णालयाने रात्रभर माझ्या 4 महिन्याच्या मुलीला कोविड सेंटरला दाखल न करता आम्हाला जनरल वार्डमध्ये ठेवले. यानंतर पहाटेच्या सुमारास इथे उपचार होणार नाही, म्हणून वायसीएम रुग्णालयात जा, असे सांगून वायसीएमला हलविण्यात आले. आज माझ्यासारखी अनेक लोक गावाकडून येऊन शहरातील रुग्णालयात विविध रुग्णांवर उपचार घेत आहे. मात्र, असे काही घडल्याने 'आपलं गाव बरा.. जगली तर आपली आणि मेली तरी आपली' अशी मानसिकता निर्माण होत आहे, अशी भावना शाफि सय्यद यांनी व्यक्त केल्या. तर याप्रकरणी हॉस्पिटल प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.