पुणे - सध्या देशात, राज्यात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू आहे. यामध्ये सरकारने काही अटी शिथिल केल्या आहेत. जे परराज्यातील कामगार अडकले आहेत आणि ज्यांना आपल्या मूळ गावी परत जायचे आहे त्यांना सोडवण्यासाठी प्रशासन काम करत आहे. काही जणांना रेल्वेने तर काहींना ट्रॅव्हल्सने पाठवले जात आहे.
परराज्यातील अनेक कामगारांना आपल्या घरी जाण्याची अनावर ओढ दिसून येते आहे. त्यातूनच काही जण पायी चालत निघाले आहेत. ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन पुणे पोलीसदेखील ट्रॅव्हल्स कंपनीच्या मदतीने परराज्यातील कामगारांना त्यांच्या गावी पोहोच करत आहेत. वाघोली परिसरातील कामगारांना त्यांच्या गावी पोहोचवत आहेत. या कामगारांना गावी जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करून देण्यात आली आहे. परराज्यातल्या लोकांसोबतच पुण्यातून राज्याच्या इतर भागात जाऊ इच्छिणाऱ्यांची संख्याही खूप मोठी आहे. त्यांनाही खासगी बसची व्यवस्था करून देण्यात आली आहे.