पुणे - आगामी अर्थसंकल्प देशासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. मात्र, या अर्थसंकल्पासाठी पंतप्रधानांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनाच विश्वासात घेतलेले नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांचा नाही तर पंतप्रधानांचाच असणार आहे. तसेच आता हे अर्थसंकल्प सादर करायला तरी अर्थमंत्र्यांना बोलावणार का? नाही ते पाहावे लागेल, अशी बोचरी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर केली आहे.
अर्थसंकल्पाबाबतच्या कुठल्याच बैठकांना अर्थमंत्र्यांना बोलवण्यात आले नाही. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनीच या बैठका घेतल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. निर्मला सीतारामन यांची कामगिरी सुमार आहे. पंतप्रधानांना त्यांच्यावर विश्वास नसेल, तर त्यांना परत बोलवावे. पण, भारताच्या अर्थमंत्र्यांचा अपमान करु नये, असे चव्हाण म्हणाले.
हेही वाचा - ऐतिहासिक शनिवारवाड्याचा दिल्ली दरवाजा उघडतो तेव्हा..
या अर्थसंकल्पकडून अनेक अपेक्षा आहेत, सध्या भारताची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. देशाचा विकासदर मोठ्या प्रमाणात घसरला आहे. यातून बाहेर यायचे असेल, तर अर्थसंकल्पात अनेक चांगले निर्णय अपेक्षित आहेत, असे चव्हाण म्हणाले. मोदी सरकार या अर्थसंकल्पात देशपातळीवर कर्जमाफी जाहीर करेल, अशी अपेक्षा असल्याचे ही ते म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेच्या अध्यक्षांच्या निवडीबद्दल आज जो निर्णय दिला आहे. त्यामुळे घोडेबाजार रोखायला मदत होईल, त्याचे स्वागत करत असल्याचे चव्हाण म्हणाले. नाईट लाईफ आधी मुंबईत यशस्वी होऊ द्या, मग ते पुण्यात राबवता येईल, असेही ते म्हणाले. तसेच 2014 ला शिवसेनेसोबत सरकार बनवण्याचा प्रस्ताव होता. या माझ्या विधानावर मी ठाम आहे. मात्र, त्याबाबत अधिक स्पष्टीकरण देणार नाही. कोणाशी बोलणे झाले ते सांगणार नाही, असे चव्हाण म्हणाले.
हेही वाचा - 'त्या' बाळांना निर्दयीपणे उघड्यावर टाकणाऱ्या मातापित्यांचा लागला शोध
राज्याच्या मंत्रिमंडळात सहभागी व्हायला आवडलं असतं का? यावर बोलताना, आवडलं असतं असं नाही, पण कुठेही लोकांची सेवा करायची संधी मिळणं, ही मानाची गोष्ट आहे. पण, मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची मोठी संधी मिळाली होती, असे चव्हाण म्हणाले.