पुणे - राज्यातील तुरुंगात असणाऱ्या हजारो कैद्यांसाठी तुरुंग प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तुरुंगातील कैद्यांना आता आवडीनुसार सर्व काही अन्नपदार्थ उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यामध्ये मांसाहारापासून ते मिठाईपर्यंतच्या सर्वच पदार्थांचा समावेश आहे. मात्र हे पदार्थ कैद्यांना विकत घेऊन खावे लागणार आहेत. राज्याचे तुरुंग महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी ही माहिती दिली. त्यामुळे येत्या काळात राज्यातील तुरूंगात हॉटेलचा फील आला तर आश्चर्य वाटायला नको.
तुरुंगातील कैद्यांना कोणते पदार्थ मिळणार ?
अंडाकरी, वडापाव, उकडलेले अंडे, चिकन, मासे, लाडू चिवडा, शंकरपाळे, श्रीखंड, करंजी, पापडी, लोणचे, बेकरीचे पदार्थ, चकली, शिरा, ड्रायफ्रूट्स, पनीर, लस्सी, दही, सरबत, गुलाबजामुन, आंबा, पेरू, बदाम, जिलेबी, पेढे, बटाटा भजी, आलेपाक, खिचडी, डिंक लाडू, गाईचे शुद्ध तूप, बटर ही खाण्याचे पदार्थ तर याव्यतिरिक्त अंघोळीचे साबण, बूट पॉलिश, टरमरिक क्रीम, फेस वॉश, ग्रीटिंग कार्ड यासारख्या वस्तू राज्यभरातील तुरुंगात असणाऱ्या कॅन्टीनमध्ये उपलब्ध होणार आहेत.
हे सर्व पदार्थ तुरुंगातील कँटीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध
राज्यभरातील तुरुंगामध्ये हे सर्व खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यासाठी कैद्यांना दर महिन्याला त्यांच्या कुटुंबाकडून मिळणाऱ्या पैशातून साडेचार हजार रुपये खर्च करण्याची मुभा असते. या पैशाचा वापर करून कैदी कॅन्टीन मधून त्यांना पाहिजे तो पदार्थ खरेदी करू शकतील, अशी माहिती सुनील रामानंद यांनी दिली.
पॅरोलवर जाण्याची मुभा असतानाही कैद्यांचा बाहेर जाण्यास नकार
येरवडा कारागृहात सध्या अनेक कैदी शिक्षा भोगत आहेत. शिक्षा भोगणाऱ्या काही कैद्यांना पॅरोलवर बाहेर सोडले जाते. सध्या राज्यातील वेगवेगळ्या कारागृहातील 53 कैद्यांना पॅरोलवर बाहेर जाण्याची मुभा असतानाही ते कैदी बाहेर जाण्यास नकार देत आहेत. थोडक्यात त्यांनी बाहेर न जाता तुरुंगातच राहणे पसंत केले असल्याचे सुनील रामानंद यांनी सांगितले.
हेही वाचा - VIDEO: कारच्या बोनेटवर बसून गाठलं मंगल कार्यालय, लग्नाच्या दिवशीच नववधूवर गुन्हा दाखल
हेही वाचा - योग्यवेळी निर्णय घेणार, समर्थकांची समजूत काढताना पंकजा मुंडेंचे सूचक वक्तव्य