पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील फुगेवाडी येथे गर्भवती पत्नीचा खून करून स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी घडली. पत्नीचा खून आपणच केल्याची पतीने कबुली दिली. फोन करूनही ती न आल्याच्या रागातून खून केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
त्याचे पत्नीसोबत फोनवर बोलत असताना भांडण झाले होते. याच रागातून त्याने पत्नीचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केला, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पूजा घेवंदे असे मृत पत्नीचे नाव असून, प्रवीण घेवंदे असे आरोपी पतीचे नाव आहे.
पूजा ही बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. त्यानंतर, तिचे पती प्रवीणशी फोनद्वारे बोलणे होत असे. त्यांचे अनेकदा फोनवर भांडण होत असे. गेल्या काही दिवसांपासून प्रवीण हा मानसिक संतुलन बिघडल्या सारखं करत होता. प्रवीणने अनेकदा कॉल करूनही पत्नी पूजा पिंपरी-चिंचवड शहरात भेटायला आली नाही. रविवारी पूजा आईसह फुगेवाडी येथे आली, दोन्ही मुलांना भेटली आणि आत जाऊन चहा करत असताना, अचानक प्रवीणने तिच्या मानेवर उलट्या कुऱ्हाडीने प्रहार केला. यात तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रवीणने स्वतःवर धारदार शस्त्राने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.