पुणे - देशात कोरोनाची सर्वाधिक गंभीर परिस्थिती पुण्यात आहे, असे मत केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले. पुण्यातील कोरोनाच्या स्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी आज प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत विधान भवन येथे विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री दत्ता भरणे आदी उपस्थित आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी प्रकाश जावडेकर यांच्यासमोर विभागीय स्तरावरचा 'कोरोना स्थिती अहवाल' सादर केला. यावेळी प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात कोरोना चाचण्या वाढवण्याच्या सूचना केल्या.
ज्या भागात कोरोनाची स्थिती गंभीर आहे तिथे अधिक लक्ष घालून त्यामागची कारणे शोधावीत. कारणे शोधल्यानंतर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जावडेकर यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहे. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीही शहरातील कोरोना स्थितीचे सादरीकरण केले.
केंद्र सरकार नागरिकांना कोरोनापासून दिलासा देण्याकरिता 'कोरोना से मत डरो, सावधानी से काम करो,' असा नारा देत आहे. याबद्दल नागरिकांमध्ये प्रबोधन केले पाहिजे, अशा सूचनाही जावडेकर यांनी अधिकाऱयांना केल्या.
दरम्यान, पुण्यातील जम्बो सेंटरवरून शरद पवार यांनी शुक्रवारी नाराजी व्यक्त केली. परिस्थिती बिघडत असल्याने त्यांनी पुण्यातील प्रशासनाची त्यांनी खरडपट्टी काढली. पुण्यातील कोरोना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यासाठी आता शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे.