पुणे - राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना विचारले असता ते म्हणाले की, या सरकारला शेतकऱ्यांच्या विषयाशी अजिबात देणेघेणे नाही. रविवारी एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांचा मुद्दा सर्वात शेवटी मांडला. त्यामुळे शेतकऱ्यांचा मुद्द सरकारच्या लिस्टमध्ये शेवटी आहे. ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना कितीवेळा दुपार पेरणी करावी लागणार हे सरकारलाच माहिती नाही. त्यामुळे हे सरकार खिसेभरू सरकार आहे.
पुढील काळात आम्ही भाजपबरोबर राहणार नाही हे मी निश्चित सांगतो. बाकी दुसऱ्या कोणाबरोबर राहायचे हे अजून ठरत नाही - प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर हजेरी - वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर हजेरी लावली. यावेळी आंबेडकर आजच्या आयोगाच्या बैठकीबाबत म्हणाले की, आयोगाच्या सदस्यांच्या बरोबर चर्चा झाली आणि न्यायालयातील कारवाईला देखील सुरुवात झाली. यात मी काही मुद्दे उपस्थित केले. त्यासंदर्भात असलेली चौकशी देखील करायला मी सांगितले आहे. यात न्यायालयाने सांगितले की, याबाबत माझे एक शपथपत्र येत्या 24 तारखेपर्यंत सादर करावा असे त्यांनी सांगितले. ते मी देणार आहे. जो प्रकार मुंबईच्या 26/11 बाबत घडला तोच प्रकार या कोरेगाव भीमा प्रकरणाबाबत देखील घडला आहे. कारवाई झाली की नाही याबाबत आयोगाच्या रेकॉर्डवर काहीही नाही. जे जे मला मांडायचे आहे ते येत्या 24 तारखेला शपथपत्रात मांडणार असल्याचे यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आहे.
अजित पवारांना टोला - रविवारी अजित पवार गटाचे मंत्री शरद पवारांच्या भेटीला गेले होते. यावर आंबेडकर यांना विचारले असता ते म्हणाले की, दुर्दैवाने अजित पवार यांना यावेळेसची दिवाळी एकट्यालाच साजरी करावी लागणार आहे. पण पुढच्या वर्षी ते दिवाळी कुटुंबात साजरी करतील अशी आशा करू. असा टोला यावेळी त्यांनी लगावला आहे.
भाजपसोबत जाणार नाही - राज्यातील राजकारण पाहता वंचितची काय भूमिका राहणार आहे याबाबत आंबेडकर यांना विचारले असता ते म्हणाले की, पुढील काळात आम्ही भाजपबरोबर राहणार नाही हे मी निश्चित सांगतो. बाकी दुसऱ्या कोणाबरोबर राहायचे हे ठरत नाही, असेही आंबेडकर म्हणाले.
भाजपवर टीका - अजित पवार यांचे बंड हे 2024 साठी असून भाजपला लोकसभा जिकायची आहे असे अमोल कोल्हे म्हणाले होते. यावर आंबेडकर यांना विचारले असता ते म्हणाले की, अजित पवार हे एक स्मॉल प्लेअर आहेत. कर्नाटकच्या निवडणुकांच्या आधी अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी महाराष्ट्रातील 48 च्या 48 जागा भारतीय जनता पक्षाला जिंकायच्या आहेत असे सांगितले होते. भाजपला कर्नाटकमध्ये नुकसान होणार आहे हे त्यांना माहिती होते. तेथील नुकसान हे त्यांना महाराष्ट्रातून भरून काढायचे आहे. येथे विरोधी पक्षच जर आपण ठेवला नाही तर आपल्याला सर्व जागा जिंकता येतील हे त्यांना माहिती आहे. तसेच राजकारण सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. दुर्देवाने राज्यातील विरोधी पक्ष भाजपचे हे स्कीम समजू शकले नाहीत याचे दुःख आहे, असे यावेळी आंबेडकर म्हणाले.
हेही वाचा -