पुणे : हनीट्रॅपमध्ये अडकून पाकिस्तानला गुप्त माहिती दिल्याच्या आरोपात अटकेत असलेले डीआरडीओचे तत्कालीन संचालक प्रदीप कुरुलकर यांची पॉलीग्राफ आणि व्हॉइस टेस्ट चाचणी करण्याची मागणी आज एटीएसने न्यायालयात केली होती. न्यायालयाने याबाबत 7 जुलै रोजी निकाल देणार असल्याचे सांगितले आहे.
2000 पानांचे चार्जशीट दाखल : डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी कुरुलकर यांची पॉलीग्राफ आणि व्हॉइस टेस्ट चाचणी करण्याची मागणी एटीएसकडून करण्यात आली. तसेच प्रदीप कुरुलकर तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोपही एटीएसने केला. डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या विरोधात दहशतवादी विरोधी पथकाने न्यायालयात 2000 पानांचे चार्जशीट दाखल केले आहे.
लॅपटॉप व अन्य साहित्य जप्त : प्रदीप कुरुलकर यांना हनीट्रॅप प्रकरणात 3 मे रोजी एटीएस कडून अटक करण्यात आली होती. तेव्हा ते वापरत असलेला मोबाईल, लॅपटॉप आणि अन्य साहित्य एटीएसने ताब्यात घेतलं होतं. एटीएसने लपटॉपसह अन्य साहित्य पुण्यातील फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी दिले होते. त्या तपासणीत डीआरडीओने सोपविलेला लॅपटॉप हा कुरुलकर यांचा नसून दुसऱ्या कोणाचा तरी असल्याचे निष्पन्न झाले. एटीएसने ही बाब डीआरडीओच्या दिल्लीस्थित व्हिजिलन्स अँड सिक्युरिटी विभागाचे संचालक कर्नल प्रदीप राणा यांना पत्राद्वारे कळविली. राणा यांनी याची दखल घेत कुरुलकरचा लॅपटॉप सीलबंद करून 26 मे रोजी एटीएसच्या ताब्यात दिला होता.
झारादास गुप्ता सहआरोपी : प्रदीप कुरुलकर यांना आपल्या जाळ्यात ओढून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्या झारादास गुप्तालाही एटीएसने सहआरोपी म्हणून रेकॉर्डवर घेतले आहे. झारादास गुप्ता आणि कुरुलकर हे दोघेही मोबाईलवर बोलत असताना तो कॉल युनायटेड किंगडम येथून आल्याचे भासवले जात होते. प्रत्यक्षात मात्र तो कॉल पाकिस्तानी इंटेलिजन्सकडून येत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कुरुलकर यांचे हे प्रकरण लक्षात आल्यानंतर त्यांचा मागील काही महिन्यांपासून सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून तपास केला गेला. त्यांच्या कृत्यांचा पर्दाफाश झाल्यानंतर त्यांच्या विरुध्द एटीएसकडे तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर 3 मे रोजी त्यांना अटक करण्यात आली.
हेही वाचा :