पुणे : पुण्यातील शिवाजीनगर भागामध्ये प्रसार भारतीचे मुख्य केंद्र आहे. या ठिकाणची चार एकर जागा आहे. त्या भूखंडावर सरकारचा डोळा आहे आणि त्यासाठीच हे माहिती प्रसारण केंद्र इथून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला, असा आरोप होता. त्या संदर्भात पुणेकरांमध्ये प्रचंड मोठा संताप पाहायला मिळत होता. स्वतः पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीसुद्धा यासाठी मी विनंती करणार असल्याचे सांगितले होते. पुणेकरांची संतप्त प्रतिक्रिया आणि नागरिकांचा रोष पाहता निर्णय मागे घेण्यात आला आहे.
प्रकाश जावडेकरांचा पुढाकार : त्यानंतर पुण्याचे माजी मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केंद्रामध्ये माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय थांबवलेला आहे. तसा आदेश प्राप्त झाला आहे. त्यामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांचे नुकसान टळले आहे. परंतु सरकारने कायमस्वरूपी हा निर्णय स्थगित करणे गरजेचे आहे. तो कधी होईल हे पाहणे महत्त्वाचे आहे.
मंत्री अनुराग ठाकुर यांच्याशी चर्चा : याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे युनिट औरंगाबादला हलवण्याचा निर्णयाला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्थगिती दिली आहे. खासदार प्रकाश जावडेकर यांनी ठाकूर यांच्याशी संपर्क साधून या संदर्भात चर्चा केली. तसेच प्रसार भारतीचे अपूर्व चंद्र आणि मुख्य कार्यकारी अधिकारी द्विवेदी यांच्याशीही जावडेकर यांची चर्चा झाली आहे. पुणे आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे युनिट औरंगाबादला हलवण्याचा निर्णय रद्द करावा, यासंदर्भात जावडेकर यांनी चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. जावडेकर सध्या हैदराबाद येथे असून त्यांनी या विषयासंदर्भात अनुराग ठाकूर यांच्याशी फोनवर चर्चा केली. या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
कॉंग्रेसचीही होती नाराजी: प्रसार भारतीने आकाशवाणी पुणे केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आकाशवाणी पुणे केंद्राचा प्रादेशिक वृत्त विभाग १९ जून रोजी बंद होणार होते. त्यावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. त्यावर काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी प्रतिक्रिया दिली होती. जनतेच्या हितासाठी या बातम्या जनतेपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. मात्र, मोदी सरकार सगळ्या स्वायत्त संस्थेवर गदा आणत आहे. अवघ्या नऊ वर्षात सरकारला याशिवाय काही करता आले नाही. या राज्यातले प्रोजेक्ट गुजरातला पळवण्याशिवाय दुसरे कोणते काम सरकारने केले, असा प्रश्न गोपाळ तिवारी यांनी विचारला होता.
पुणे केंद्रात सर्वाधिक श्रोते : आकाशवाणी पुण्याचे केंद्र आणि श्रोते यांचे घट्ट नाते आहे. आकाशवाणीचे लहानांपासून वृद्धांपर्यंत चाहते आहेत. 80-90 च्या दशकात जन्मलेल्यांसाठी आकाशवाणी हा सॉफ्ट कॉर्नर आहे. त्यामुळेच आकाशवाणीच्या देशातील विविध स्थानकांपैकी पुणे स्थानकाला सर्वाधिक श्रोते लाभले होते. पुणे आकाशवाणी केंद्राच्या श्रोत्यांची संख्या जवळपास २४ लाख आहे.
हेही वाचा