बारामती - दरवर्षी जून महिन्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होते. मात्र यंदा राज्यासह देशात कोरोनाचे सावट असल्याने शाळा सुरू होण्याबाबत संदिग्धता कायम आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या हेतूने बारामतीतील अनेक खासगी शाळांनी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. अशाच प्रकारे जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या गोरगरीब मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी नगरपालिकेच्या शाळांनी ऑनलाइन शिक्षण प्रणालीचा अवलंब केलाय.
बारामती नगरपालिका क्षेत्रात मराठी माध्यमांसह इंग्रजी व उर्दू माध्यमाच्या १० शाळांचा समावेश आहे. या शाळांमधून बारामती शहरातील गोरगरीब व हातावरचे पोट असणाऱ्या कुटुंबीयातील ३ हजार २५३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळा सुरू करण्याबाबत शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत या विद्यार्थ्यांना व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे यावर्षीचा अभ्यासक्रम शिकवण्यात येणार असल्याचे नरपालिकेने सांगितले.
मात्र, नगरपालिकेच्या शाळेत शिकणारी मुलं बहुतांश आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या कुटुंबातील आहेत. त्यामुळे या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्टफोन नाहीत. यामुळे मोबाइल नसलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचा धोका आहे. त्यामुळे एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही; तसेच त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची प्रशासनाने वेळीच दखल घेऊन उपाययोजना करण्याची मागणी पालक करत आहेत.
ग्रामीण भागात खरी कसोटी
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा जून महिन्यात नियमित शाळा सुरू होण्याची शक्यता कमी आहे. ऑनलाइन शाळेचा मुद्दा पुढे आला, तरीही ग्रामीण भागातील पालकांकडे स्मार्टफोन उपलब्ध नाहीत. तसेच भारनियम आणि अन्य संसाधनांच्या अभावामुळे ग्रामीण भागातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे. ऑनलाइन शिक्षण देत असताना सरकारने आमच्या या अडचणी लक्षात घेऊन उपाययोजना कराव्यात, अशी ग्रामीण भागातील पालकांची भूमिका आहे.
बारामती नगरपालिकेच्या शाळा व विद्यार्थी संख्या
इंग्रजी माध्यम- ०१( शाळा) १३० ( विद्यार्थी )
मराठी माध्यम- ०८( शाळा) १३०० ( विद्यार्थी )
उर्दू-०१ ( शाळा) १८२३ ( विद्यार्थी )
शासनाचा आदेश येईपर्यंत शाळा सुरू होणार नाहीत. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. म्हणून विद्यार्थ्यांच्या पालकांचे व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आल्याचे पी.एस दिंडे यांनी सांगितले आहे. त्या नगरपालिकेत प्रशासकीय अधिकारी आहेत. सध्या याच ग्रुप्सद्वारे विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्या म्हणाल्या.