बारामती (पुणे) - इंदापूर शहरातील कुरेशी गल्लीत असणाऱ्या कत्तलखान्यावर काल (दि. २१ नोव्हेंबर) रात्री उशिरा पोलिसांनी छापा टाकून कत्तल करण्यासाठी आणलेल्या ६३ लहान वासरांची सुटका केली. या कारवाईत एक म्हशीचे रेडकू, वाहन, कापलेले ५० किलो वासरांचे मांस, असा ३ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
याप्रकरणी अजीम सुनील कुरेशी, जमीर कुरेशी, रशीद बेपारी (सर्व. रा. कुरेशी गल्ली, इंदापूर), बंडू दगडू जाधव (रा. रामोशी गल्ली, इंदापूर) यांच्यावर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार शंकर वाघमारे यांनी तक्रार दिली आहे.
गोपनीय माहितीवरून केली कारवाई
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, इंदापूर शहरातील कुरेशी गल्लीतील कत्तलखान्यात लहान वासरांना आणले आहे, अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून ६१ हजार रुपये किंमतीच्या जर्सी गाईची वासरे, १ हजार रुपये किमतीचे म्हशीचे रेडकू, तीन लाख रुपये किंमतीचे एक वाहन, असा एकूण ३ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.