पुणे - सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने सार्वजनिक रस्त्यावर थुंकल्यास दंड आकारला जातो. महानगरपालिकेने अनेक नागरिकांकडून हजारो रुपये दंड वसूल केला आहे. परंतु, अनेक नागरिक याचे पालन करत नाहीत. अशाच एका नागरिकाला पोलीस अधिकाऱ्याने अद्दल घडवली आहे.
सध्या कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. त्यामुळे खोकताना किंवा शिंकताना तोंडावर हात ठेवावा, असे वारंवार सांगितले जाते. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर थुंकू नये असे सांगितले जाते. तसेच महानगरपालिका अशा नागरिकांना दंडही ठोठावत असते. काल दुपारी चारच्या सुमारास गुन्हे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे हे मोटारीने जात असताना मोरवाडी चौकात एक नागरिक रस्त्यावर थुंकताना दिसला. तेव्हा, निकाळजे यांनी वाहन चालकाला मोटार थांबवायला सांगत त्या नागरिकाला बोलावून घेतले. थुकल्याबद्दल या नागरिकाची कानउघाडणी करून त्याच्याच रुमालाने रस्त्यावर थुंकलेले पुसायला लावले. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. नागरिकांनी रस्त्यांवर थुंकू नये, असे आवाहनही निकाळजे यांनी केले आहे.