पुणे - पश्चिम महाराष्ट्रात लोहमार्गावर रेल्वे गाड्यांचा अपघात घडवून आणण्याचा कट उघडकीस आला आहे. मध्य रेल्वेच्या पुणे मंडळाने या प्रकाराची दखल घेतली असून रेल्वे पोलिसांनी संशयितांचा तपास सुरू केला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम महाराष्ट्रातील लोहमार्गावर लोखंडाचे मोठे तुकडे टाकून रेल्वेचा अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात होता. लोको पायलटच्या सतर्कतेमुळे अनेकदा हे अपघात रोखण्यात आले आहेत. मात्र, गेल्या डिसेंबर महिन्यापासून वारंवार रचण्यात आलेल्या घातपाताच्या कटांमुळे मध्य रेल्वेच्या पुणे मंडळाने या सर्व घटनांच्या तपासाचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणेच लोहमार्गावरील देखरेखही वाढवण्यात आली आहे.
रेल्वेने केलेल्या तपासानुसार, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कोल्हापूरच्या रुकडी (ता. हातकणंगले जि. कोल्हापूर) रेल्वे स्थानकाजवळ काही समाजकंटकांनी लोखंडाचे मोठे तुकडे मार्गावरती टाकले होते. त्याप्रमाणेच तळेगाव-कामशेत सेक्शनमध्ये मुंबई-हैदराबाद रेल्वेच्या मार्गातही लोखंडाचे तुकडे आढळून आले आहेत. या प्रकारची घटना गेल्या डिसेंबर महिन्यात देहूरोड स्थानकाजवळही घडल्याचे रेल्वेच्या निदर्शनास आले आहे. यावेळी लोखंडाचा एक तुकडा पुणे-लोणावळा लोकलच्या इंजिनला धडकला होता, मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही हानी झाली नाही.
लोहमार्गावर वारंवार अडथळे निर्माण करून रेल्वे प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या समाजकंटकांच्या विरुद्ध रेल्वेने कारवाई सुरू केली आहे. त्याप्रमाणेच अशा प्रकारचा घातपात किंवा संशयितांच्या संदर्भात कोणतीही माहिती असल्यास त्वरित रेल्वे प्रशासनाला सुचित करण्याचे आवाहन मध्य रेल्वेच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.