पुणे - अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यामध्ये दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली हओती. त्यामुळे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी या चोरीच्या प्रकरणांचा तपास करून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. या प्रकरणांचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे ग्रामीण जिल्ह्यातील नारायणगाव, जुन्नर, आळेफाटा तसेच नगर जिल्ह्यातील अनेक भागात फिरून माहिती घेण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जून २०२१ रोजी जुन्नर तालुक्यातील खोडद या गावात काही जण कुठल्याच प्रकारचा कामधंदा न करता वारंवार विविध कंपनीच्या मोटारसायकल वापरत आहेत, अशी माहिती एका बातमीदाराने दिली. पोलीस खोडद या गावी गेल्यानंतर पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाऊ लागले. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. पण सखोल चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या ताब्यातील विविध कंपनीच्या ११ दुचाकी चोरी करून आणल्याची कबुली दिली. सिद्धार्थ रमेश बर्डे (वय २१ रा. खोडद ता. जुन्नर) आणि एक विधिसंघर्षग्रस्त बालक अशी आरोपींची नावं आहेत.
चौकशी दरम्यान आरोपीने पुणे आणि नगर भागात चोरी केलेल्या इतर दुचाकींची माहिती दिली. या आरोपीवर विविध पोलीस स्टेशनमध्ये चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या आरोपींकडून ४,१०,००० रु. किमतीच्या एकूण ११ दुचाकी जप्त केल्या असून ८ गुन्हे उघडकीस आणले आहे. आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी नारायणगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख उप. विभा. पोलीस अधिकारी मंदार जवळे, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या आदेशाने सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस हवालदार विक्रम तापकीर, पोलीस हवालदार सचिन गायकवाड यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.