पुणे - टिकटॉकच्या वेडापायी चांगले कपडे परिधान करून तो मंगल कार्यालयातून महागडे कॅमेरे चोरायचा. मंगल कार्यालयातून महागडा कॅमेरा आणि लेन्सची चोरी करणाऱ्या या तरुणाला अटक करण्यात आली आहे. हडपसर पोलीस ठाण्यामध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतीक गव्हाणे (वय १९) असे या चोरट्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महेश पवार हे व्यावसायिक फोटोग्राफर आहेत. १४ फेब्रुवारीला एका मंगलकार्यालयात लग्नाची ऑर्डर होती. सायंकाळच्या सुमारास लग्न असल्याने फिर्यादी कामात व्यस्त होते. दरम्यान, त्यांची कॅमेऱ्याची बॅग चोरीला गेली. लग्नाच्या गडबडीत बॅग इतर कोणाकडे गेली असेल असे समजून त्यांनी २ दिवस वाट पाहिली. परंतु, बॅग मिळत नसल्याने त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तपासादरम्यान पोलिसांनी मंगल कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक तरुण संशयास्पद अवस्थेत बॅग घेऊन जाताना दिसला. त्यानंतर पोलिसांनी शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने कॅमेरा चोरल्याचे कबूल केले.
हेही वाचा - आईला त्रास देणाऱ्या दारूड्या पित्याचा मुलाकडून खून; देहूतील प्रकार
आरोपी प्रतीक गव्हाणे याला फोटोग्राफी आणि टिकटॉक व्हिडीओची आवड आहे. परंतु यासाठी लागणारे कॅमेरे विकत घेऊ शकत नसल्याने त्याने चोरीचा मार्ग निवडला. यासाठी तो चांगले कपडे परिधान करून मगरपट्टा येथील लॉन्समध्ये जायचा. जेवणावर ताव मारून त्यानंतर फोटोग्राफर कॅमेरा कोठे ठेवतो यावर लक्ष ठेऊन असायचा. फोटोग्राफर नवरी-नवरदेवाचे फोटो काढण्यात व्यग्र असताना कॅमेऱ्याची बॅग घेऊन पळ काढायचा. मात्र, त्याचा डाव यावेळी फसला असून चोरी केलेल्या कॅमेऱ्याची बॅग पोलिसांनी त्याच्याकडून हस्तगत केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार रमेश साबळे करीत आहेत.
हेही वाचा - चाकणमध्ये वर्कशॉप मालकाची दगडाने ठेचून हत्या; हल्लेखोर फरार