पुणे - ग्रामीण पोलिसांनी एका बोगस डॉक्टरचा पर्दाफाश केला आहे. मेहमूद फारुक शेख असे नाव असतानाही या भामट्याने महेश पाटील या नावाने बोगस सर्टिफिकेट घेतले. त्या आधारे त्याने शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उघडले होते. मागील दोन वर्षांपासून तो हे हॉस्पिटल चालवत होता.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कारेगाव येथे मेहमूद शेख हा बोगस डॉक्टर रूग्णालय चालवत असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर ग्रामीण पोलिसांच्या एका पथकाने मेहमूद फारुक शेख (रा. त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स कारेगाव, मूळ गाव पीर बुरहान नगर नांदेड) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
मेहमूद शेख हा मूळचा नांदेड येथील रहिवासी आहे. त्याने महेश पाटील या नावाने एमबीबीएसचे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करून घेतले होते. त्या कागदपत्राच्या आधारे त्याने दोन वर्षांपूर्वी कारेगाव येथे श्री मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरु केले होते. या ठिकाणी तो रुग्णांवर उपचार ही करत होता. त्याने महेश पाटील नावाने बनावट आधार कार्ड आणि शिक्के देखील तयार करून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.