पुणे - पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपीएमएलकडून सर्व मार्गांवर उद्यापासून (7 जून) २५% बसेस ५०% प्रवाशी क्षमतेने सर्वांसाठी सुरू करण्यात येत आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार सार्वजनिक प्रवासी वाहतुकीवर ३ एप्रिलपासून संपूर्णपणे निर्बंध घातले होते. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांसाठीची बस वाहतूक वगळता महामंडळाची प्रवासी वाहतूक संपूर्णतः बंद करण्यात आली होती. मिशन बिगीन अंतर्गत पुन्हा पुण्यातील पीएमपीएमल सर्वांसाठी सुरु करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात १३ आगारांकडील १७९ मार्गांवर ४१६ बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
सर्व मार्गांवर 400 पेक्षा जास्त बस धावणार
लॉकडाऊनमुळे पीएमपीपुढे आर्थिक संकट निर्माण झालेले आहे. आता नव्या आदेशानुसार बससेवा ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. शहरातील सर्वच मार्गावर उद्यापासून 400 पेक्षा जास्त बसेस धावणार आहेत. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून पीएमपीएमएल सुरु करण्यात येणार आहे. विना मास्क प्रवाशांना बसमधून प्रवास करता येणार नाही.
या मार्गांवर धावणार बस
शहरातील स्वारगेट ३२, न ता वाडी ५२, कोथरूड ३५, कात्रज ४६, हडपसर ३७, मार्केट यार्ड २१, पुणे स्टेशन ३३, निगडी ४५, भोसरी ३१, पिंपरी ३३, भेकराईनगर २१, शेवाळवाडी १७, बालेवाडी १३ अशा 25 टक्के प्रमाणे डेपोनिहाय 416 बसेसचा अत्यावश्यक सेवेत समावेश असणार आहे.
'प्रवाशांनी नियमांचे पालन करावे'
अत्यावश्यक सेवेकरिता सुरू असलेल्या बसेसचा या ४१६ बसेसमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या बसेसची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करूनच बसेस मार्गस्थ केल्या जाणार आहेत. प्रवाशांनी बसमध्ये सोशल डिस्टन्स, मास्कच्या नियमांचे पालन करावे. विनामास्क प्रवाशांना बसमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तरी आसन क्षमतेच्या ५०% पेक्षा जास्त प्रवाशांनी बसू नये, असे आवाहन पीएमपीएमएल प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
हेही वाचा - दुसऱ्या लाटेची कल्पना असताना बेड्स का कमी केलेत? प्रियांका गांधींचा केंद्राला सवाल