पुणे - इंधनांच्या वाढत्या दरांचा फटका आता पुण्यातल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला देखील बसला आहे. त्यामुळे प्रदूषण आणि खर्च कमी करण्यासाठी पीएमपीएमएलने आता डिझेल बसेसचे सीएनजी बसेसमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रायोगिक तत्वावर 5 बसेसच सीएनजीत रूपांतर
गेल्या दिड वर्षांपासून पुणे महानगर परिवहन महामंडळाला आर्थिक फटका बसला आहे. लॉकडाऊनमध्ये बससेवा बंद होती. त्यानंतर केवळ अत्यावश्यक सेवेसाठी बस सुरू ठेवल्याने पीएमपीएमएलचे
उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटले आहे. प्रतिकिलोमीटर डिझेल बसला येणारा खर्च लक्षात घेता महामंडळाने पीएमपीएमएलच्या डिझेल बसेस सीएनजीवर करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या एकूण २३३ बसेस आता सीएनजी बसेसमध्ये रुपांतरीत करण्यात येणार आहेत. सुरुवातीला यासाठी ५ बस प्रायोगिक तत्वावर रुपांतरीत करण्यात येणार आहेत. यानंतर इतर बसेसदेखील सीएनजीमध्ये रुपांतरीत करण्यात येणार आहे.
वर्षभरात गाड्यांना येणार खर्च निघेल आणि त्यानंतर फायदाच फायदा
डिझेल बसमुळे प्रतिकिलोमीटर 30 ते 35 रुपये खर्च येत असून सीएनजीमध्ये त्याचा 18 ते 25 रुपये खर्च येतो. पीएमपीएमएलच्या सव्वा दोनशे बसेसला सीएनजी बसमध्ये रुपातंरीत करण्यासाठी 11 ते 12 कोटी खर्च येत आहे. जर या बसेस सीएनजीमध्ये रुपांतरित झाल्या तर एका वर्षात यांचा संपूर्ण खर्च भरूण निघणार असून बसेसचे आयुष्यमान असेपर्यंत त्याचा फायदा होणार आहे. तसेच सीएनजी बसेसमुळे प्रदूषण कमी होणार असून बसच्या इंजिनचे आयुष्य देखील वाढेल. त्याचबरोबर एकूण खर्च देखील कमी होईल, असे पीएमीपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी सांगितले.