पुणे - महसुलात घट झाल्याने महानगर परिवहन महामंडळाला 110 कोटी रुपये देण्याच्या मागणीला महानगरपालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. यापैकी 30 कोटी रुपयांचा पहिला हप्ता आता देऊन उर्वरित रक्कम टप्प्या-टप्प्याने देली जाणार आहे, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.
कोरोना लॉकडाऊनचा फटका इतर सार्वजनिक वाहतुकीप्रमाणे पीएमपीएमएललाही बसला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून अत्यावश्यक सेवा वगळता पीएमपीएमएल सेवा पूर्णपणे बंद होती. शिवाय आताही पीएमपीएमएलने बिल न दिल्याने इंधन पुरवठा रोखण्याचा इशारा सीएनजी कंपनीने दिला आहे. या पार्श्वभूमीवर पीएमपीएमएलने पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांना पत्र देऊन महसुलात झालेल्या घटापोटी रक्कम देण्याची मागणी केली होती. त्यावर आज स्थायी समितीने याबाबत निर्णय घेतला.
'पीएमपीएमएल'ला कोट्यवधींचा तोटा -
एप्रिल महिन्यापर्यंत पीएमपीएमएलला 180 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. यातील 110 कोटी रुपये आणि मागील 92 कोटी रुपये, अशी एकूण 202 कोटी रुपयांची रक्कम पीएमपीएमएलने पुणे महानगरपालिकेकडे मागितली होती. ही रक्कम देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला आहे. मात्र, कोरोनामुळे मनपाची देखील आर्थिक स्थिती चांगली नाही, त्यामुळे ही रक्कम टप्प्यांमध्ये दिली जाणार आहे. 30 कोटी रुपयांचा पहिला हप्ता दिला जाणार असून उर्वरित रक्कम नंतर दिली जाणार, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.
लॉकडाऊनमध्ये झालेली तूट आणि लॉकडाऊननंतर पीएमपीएमएल सुरू झाल्यानंतरही कमी प्रवाशांमुळे पीएमपीएमएलला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. आर्थिक संकटात असलेल्या पीएमपीएमएलला स्थायी समितीच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.