पुणे - कोरोनावर उपाय असलेली लस तयार करण्याचे काम देशातील काही संस्थांमध्ये सुरू आहे. या लस निर्मितीची पाहणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार आहेत. गुजरात, हैदराबाद आणि पुणे या तीन शहरातील कोरोनावर लस निर्माण करणाऱ्या संस्थांना पंतप्रधान भेट देणार आहेत.
मोदींच्या दौऱ्याची वेळ बदलली..
पंतप्रधानांच्या या दौऱ्याच्या पूर्वनियोजित वेळेनुसार ते दुपारी एकच्या सुमारास सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार होते. मात्र, आता नवीन वेळेनुसार ते आधी हैदराबादच्या भारत बायोटेकमध्ये जाणार असून ते दुपारी तीनच्या सुमारास पुण्यात येणार आहेत. याशिवाय ते अहमदाबादमधील झायडस बायोटेक पार्कलाही भेट देतील.
असा असणार दौरा..
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (दि. 28 नोव्हेंबर) हैद्राबाद विमानतळावरून पुण्याकडे निघतील आणि दुपारी दुपारी 3 वाजून 50 मिनिटांनी पुणे विमानतळावर आगमन होईल. 3 वाजून 55 मिनिटांनी हेलिकॉप्टरने सिरम इन्स्टिट्यूट जवळील हेलिपॅडकडे रवाना होतील. त्यानंतर दुपारी 4.25 ते 5 वाजून 25 मिनिटे या एक तासात पंतप्रधान सिरम इन्स्टिट्यूटमध्ये असतील. या ठिकाणी कोरोनावरील लसीच्या सद्यस्थितीबाबत माहिती घेतील. त्यानंतर 5 वाजून 35 मिनिटांनी हेलिकॉप्टरने पुणे विमानतळाकडे रवाना होतील. त्यानंतर 5 वाजून 50 मिनिटांनी पंतप्रधान दिल्लीला रवाना होतील.
१०० राजदूतांचा दौरा रद्द..
येत्या 4 डिसेंबरला विविध देशांचे 100 राजदूत पुणे दौऱ्यावर येणार होते. मात्र, काही कारणास्तव त्यांचा हा दौरा रद्द झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. हे सर्व राजदूत पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार होते. त्यांचा हा दौरा रद्द कशामुळे झाला याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.
हेही वाचा - कोरोना अपडेट: बारामतीत चोवीस तासांत चौघांचा मृत्यू