पिंपरी-चिंचवड - मुंबईहून हडपसर येथे गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांवर पिंपरी-चिंचवडच्या सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई केली आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पोलिसांनी कारवाई करून एक पिकअप ताब्यात घेतले असून 12 लाख 30 हजारांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी करम होशियत अली शेख आणि त्याचा एक साथीदार अशी ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
मुंबईहून हडपसरच्या दिशेने करत होते वाहतूक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून हडपसर येथे एका पिकअपमधून गुटखा आणला जाणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर सोमाटणे फाटा येथे सापळा लावून पिकअप ताब्यात घेतले.
सापळा रचून आरोपींना घेतले ताब्यात
पिकअपची झडती घेतली असता त्यात 12 लाख 30 हजार 560 रुपयांचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी गुटखा, रोख रक्कम, मोबाइल फोन आणि पिकअप असा एकूण 20 लाख 54 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत शिरगाव चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'या' पथकाने केली ही कामगिरी ही कारवाई
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त, (गुन्हे) आनंद भोईटे, सहा. पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे, पोलीस अंमलदार विजय कांबळे, सुनिल शिरसाट, संतोष बर्गे, नितीन लोंदे, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, अनिल महाजन, गणेश कारोटे, राजेश कोकाटे, सोनाली माने यांनी केली.