पुणे (पिंपरी-चिंचवड) Pimpri Chinchwad fire : पिंपरी चिंचवड शहरात काल रात्री झालेल्या तीन ते चार स्फोटासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका टँकरमधून अवैध पद्धतीने गॅस रिफिलिंग करत असताना ही दुर्घटना घडल्याचं उघड झालं असून याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचं, पोलिसांनी सांगितलं आहे.
एक टँकर आणि तीन स्कूल बस जळून खाक : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील ताथवडे परिसर येथे काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास एका 21 टन कॅप्सूल टँकर मधून अवैधरित्या कमर्शियल आणि घरगुती गॅस सिलेंडर भरण्याचं काम सुरू होतं. दरम्यान गॅसची गर्दी झाली आणि विजेच्या संपर्कात आल्यानं विस्फोट होऊ लागले. पाहता पाहता जवळपास 9 सिलेंडरचे ब्लास्ट या ठिकाणी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत एक कॅप्सूल टँकर आणि तीन स्कूल बस पूर्णतः जळून खाक झाल्या. गॅस सिलेंडरचा अचानक एकामागून एक स्फोट झाल्यानं नजीकच्या परिसरातील नागरिक प्रचंड घाबरले होते. मोठ्या प्रमाणात नागरिक स्फोटाचा आवाज ऐकून घरातून बाहेर पडले आणि रस्त्यावर गर्दी झाली. स्फोटामुळे आगीचे लोळ आणि धुराचे लोट उठले. या भीषण स्फोटाचा आवाज काही किलोमीटरपर्यंत गेला, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. स्फोट झाल्यानं अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणारे त्या ठिकाणाहून पसार झाले. सुदैवानं या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही.
घटनास्थळी सापडले 27 सिलेंडर : घटनेची माहिती मिळताच पिंपरी, थेरगाव, प्राधिकरण, रहाटणी, चिखली, भोसरी तळवडे, हिंजवडी परिसरातील अग्निशामक दल आणि स्थानिक पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले. पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, सहायक आयुक्त विठ्ठल कुबडे, पोलीस निरीक्षक मनोज खंडाळे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला होता. अग्निशमन विभागाच्या जवानांना घटनास्थळी जवळपास 27 सिलेंडर सापडले असून त्यापैकी नऊ सिलेंडरमध्ये स्फोट झालेत.
गॅसची गळती झाल्यानंतर लागली आग : मे तिरुपती कॅरियरचे 21 टन क्षमतेच्या प्रोपिलीन गॅस असलेल्या बुलेटमधून अवैध रित्या गॅसचा भरणा घरगुती 14.2kg आणि कमर्शियल सिलेंडर मध्ये करण्यात येत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये गॅसची गळती झाल्यानंतर आग लागली असावी, त्यानंतर भीतीपोटी कार्यरत कर्मचारी घटनास्थळापासून पळून गेले असावेत, त्यामुळे घटनास्थळी कोणीही जखमी अवस्थेत आढळुन आले नाही. घटना स्थळावरील आग पूर्णपणे विझवण्यात आली असली तरी कुलिंग ऑपरेशन तथा गॅस डिसीपीएट करण्याचे कार्य सुरू होते. दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही महिन्यांपासून अवैध गॅस रिफिलिंगचे धंदे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात येते. मात्र अशा पद्धतीच्या घटना वारंवार घडत आहेत. शहरात सर्रास सुरू असणाऱ्या अवैध गॅस रिफिलिंगच्या धंद्यांवर पोलीस प्रशासन आता पुढील काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
हेही वाचा :