पुणे (पिंपरी चिंचवड) : पुणे जिल्ह्यात एका व्यावसायिकाच्या मुलाचे तीस लाखाच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी सासवड येथून आरोपीला ताब्यात घेत 14 वर्षीय मुलाची सुखरूप सुटका केली आहे. आईच्या उपचारासाठी पैसे कमी पडत असल्यानं आरोपीनं हा गुन्हा केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
आरोपींची नावे : तेजस ज्ञानोबा लोखंडे (वय २१ वर्षे), रा. दत्त मंदीर शेजारी, मारुंजी, पुणे मुळ रा. मरकळ, ता. खेड, जि. पुणे), अर्जुन सुरेश राठोड (वय १९ वर्षे), रा. दत्त मंदीर शेजारी, मारुंजी पुणे, मुळ रा. लांबुरातांडा, ता. निलंगा, जि. लातूर, विलास संजय म्हस्के (वय २२ वर्षे), रा. शिवारवस्ती, भुमकरचौक, पुणे मुळ पिंपळगाव, ता. जामखेड जि. अहमदनगर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
तीस लाखांची खंडणी मागितली : आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास 14 वर्षीय मुलाचं तीन व्यक्तींनी हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतून शास्त्राचा धाक दाखवून अपहरण केलं होत. त्यानंतर आरोपींनी 14 वर्षीय मुलाच्या वडिलांना मोबाईलवर फोन करून तीस लाखांची खंडणी मागितली होती. या घटनेची तात्काळ माहिती अपहरण झालेल्या मुलाच्या वडिलांनी हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये दिली. त्यानंतर हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी आरोपीनं ज्या मोबाईलवरून खंडणीसाठी फोन केला होता, त्याचं लोकेशन सासवड येथे असल्याचं आढळून आलं. हिंजवडी पोलिसांनी तात्काळ सासवड पोलिसांना याबाबत माहिती देत आरोपी सासवड परिसरात असल्याची माहिती दिली.
अपहण प्रकरणी तीन जण ताब्यात : घटनेचं गांभीर्य ओळखून सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष शिंदे यांनी शोध मोहिम सुरू केली. तेव्हा जुना कोडीत नाका ते सोपानकाका मंदीर रोडवर पोलिसांना एक गडद निळ्या रंगाची मारुती झेन कार संशयीतरित्या समोरुन येताना दिसली. त्यावेळी पोलिसांनी गाडीची झाडाझडती घेतली. तेव्हा त्या गाडीत अपहरण झालेला 14 वर्षीय मुलगा असल्याचं निदर्शनास आलं. अपहण प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून 14 वर्षीय मुलाची सुखरूप सुटका केलीय. पोलिसांनी आरोपींची झाडा झडती घेतली असता त्यांच्याकडे 1 पिस्तूल, एक लांब पात्याचा कोयता, सत्तूर, कटावणी,एक लोखंडी हातोडी, ३ मोबाईल आणि एक लोखंडी हातोडी मिळून आले.
- पैशाची गरज असल्यानं अपहरण : आईच्या उपचारासाठी पैश्यांची गरज असल्यामुळे अपहरण पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असता, त्यातील एका आरोपींची आई आजारी असल्यानं दवाखान्यात पैशांची गरज होती, म्हणून घरासमोरून त्याचं अपहरण केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
हेही वाचा -
- Isis Module Case : चार वॉंटेड आरोपींवर ठेवलं लाखोंचं बक्षीस, इसिस मॉड्यूल प्रकरणात एनआयचा निर्णय
- Thane Crime : जिलेटिनच्या कांड्यासह डेटोनेटर्स सापडल्यानं पोलीस अलर्ट..याच ठिकाणी मनसुख हिरेनचा सापडला होता मृतदेह!
- Manipur Violence : मणिपुरात पुन्हा हिंसाचार, तिघांची गोळ्या झाडून हत्या केल्यानं तणावाची स्थिती