पुणे : भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. दुसरीकडे नाना उर्फ विठ्ठल काटे की, राहुल कलाटे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते. ऐन उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीचे नाना उर्फ विठ्ठल काटे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली. यामुळे महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्याने राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करत महाविकास आघाडीत बिघाडी केली.
महाविकास आघाडीच्या मतांचे विभाजन : उमेदवारी अर्ज मागे घ्यावा या करिता राष्ट्रवादीचे नेते, शिवसेना (ठाकरे गट) नेत्यांनी मध्यस्ती केली. मात्र, त्यांची मनधरणी कोणीच करू शकले नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राहुल कलाटे ठाम राहिले आणि उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. यामुळे भाजपाचा विजय सोयीस्कर होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कलाटे यांनी बंड केल्याने महाविकास आघाडीच्या मतांचे विभाजन होणार आहे, असे बोलले जात आहे.
जनतेच्या मनातील आमदार : परंतु, बंडखोर राहुल कलाटे २०१९ चा दाखला देत आहेत. २०१९ च्या चिंचवड विधानसभा निवडणूकीत भाजपाचे दिवंगत लक्ष्मण जगताप विरुद्ध राहुल कलाटे यांच्यात लढत झाली होती. राहुल कलाटे यांनी तेव्हा देखील बंडखोरी करत अपक्ष लढले होते. त्यांना राष्ट्रवादी पक्षाने पाठिंबा दिला होता. दिवंगत लक्ष्मण जगताप यांनी राहुल कलाटे यांचा पराभव जरी केला असला तरी मोदी लाटेत बंडखोर कलाटे यांनी १ लाख १२ हजार मते घेतली होती, त्यांचा ३८ हजार मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे आज ही तो दाखला राहुल कलाटे देत मी जनतेच्या मनातील आमदार असल्याचे सांगतात.
आरोप प्रत्यारोपांच्या फैरी : राहुल कलाटे यांनी निवडणूक चिन्ह म्हणून शिट्टी घेतली आहे. रविवारी जेष्ठ व्यक्तींच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला आहे. प्रचाराच्या माध्यमातून ते मतदारापर्यंत पोहचत आहेत. महानगर पालिकेत भाजपाने केलेल्या भ्रष्टाचाराचे ते उदाहरण देत असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. साध्य तरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत तिहेरी लढत पाहायला मिळत असून बंडखोर राहुल कलाटे यांची पुन्हा जादू चालणार हा देखील तितकाच मोठा प्रश्न आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडी आणि भाजपा स्टार प्रचारक आणून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करणार आहे. आज देखील राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची सभा होणार आहे.