पुणे - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अचानक झालेले लॉकडाऊन हे अनेकांच्या ताटातुटीला कारणीभूत ठरले. अनेकांच्या कुटुंबातील सदस्य हे वेगवेगळ्या शहरात अडकले. या संकट काळात आपल्या आप्त स्वकीयांसोबत आपल्या गावात असावे यासाठी अनेकांनी वेगवेगळे प्रयत्न केले. मात्र, पुण्यातील दिव्यांग-कर्णबधीर दांपत्य आणि त्यांच्या सहा वर्षाच्या मुलीची कहाणी डोळे पाणावणारी आहे.
पुण्यातील सदाशिव पेठेत राहणाऱ्या नातू दाम्पत्याची 6 वर्षीय मुलगी, ईशा ही 12 मार्चला तिच्या आजोळी सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कासेगाव येथे गेली होती. दोन आठवडे झाल्यानंतर ईशाला आई-बाबांची आठवण येऊ लागल्याने ती अस्वस्थ होऊन पुण्याला येण्याचा हट्ट करू लागली. १४ एप्रिलला संचारबंदी संपेल या आशेने घरचे लोक तिची कशीबशी समजूत काढत होते. मात्र, संचारबंदी वाढल्याने ईशाला समजावणे अवघड झाले होते.
अशा वेळी पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांनी पुढाकार घेऊन ईशाला पुण्यात आणण्यासाठी पोलिसांकडून परवानगी मिळवली. आपल्या कुटूंबापासून दूर असलेल्या ईशाची व्याकुळता पुणे पोलिसांच्या लक्षात आली. त्यांनी ईशाला तिच्या मामासोबत पुण्याला येण्याची परवानगी दिली. प्रवासात अडचण येऊ नये यासाठीही पोलिसांनी सोय केली. तसेच ईशाच्या मामाला गावाला परत जाण्याचीही परवानगी देण्यात आली. आपल्या आईच्या कुशीत ईशा विसावली यावेळी तिच्या आणि तिच्या पालकांच्या आनंदाला पारावर उरला नाही.