पुणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी बाळगण्याच्या सूचना वारंवार दिल्या जात आहे. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मास्क बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, म्हणतात ना हौसेला मोल नसते, याचाच प्रत्यय पुण्यात आला आहे. जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरातील एक व्यक्ती चक्क सोन्याचा मास्क वापरत असून त्याची किंमत २ लाख ९० हजार रुपये आहे.
शंकर कुऱ्हाडे, असे या व्यक्तीचे नाव असून ते बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांना आधीपासूनच सोन्याची आवड आहे. आधीच त्यांच्या हाताच्या पाचही बोटात सोन्याच्या अंगठ्या, मनगटात कडे आहे. गळ्यात जाडसर अशी सोन्याची साखळी आहे. त्यातच आता कोरोनाने थैमान घातले आहे. त्यापासून स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण करण्यासाठी निरनिराळे मास्क उपलब्ध आहेत. मात्र, अंगळी, साखळी, कडे सर्व सोन्याचे असताना मास्क देखील सोन्याचे वापरावे, असे कुऱ्हाडे यांना वाटले. तसेच त्यांनी कोल्हापुरात एका व्यक्तीने चांदीचे मास्क बनवल्याचे ऐकले होते. त्यामुळे आपण सोन्याचा मास्क बनवावा असे त्यांना वाटले. त्यांनी लगेच आपल्या सोनाराकडून २ लाख ९० हजार रुपये किमतीचा पाच तोळ्यांचा मास्क बनवून घेतला आहे. श्वास घेण्यासाठी त्या मास्कला बारीक छिद्र करण्यात आले आहे. या मास्कमुळे सर्व पंचक्रोशीत त्यांचीच चर्चा रंगली आहे.
यापूर्वी देखील पुण्यातील एका व्यक्तीने केस कापण्यासाठी चक्क सोन्याची कात्री वापरली होती. तसेच एका व्यक्तीने हौस म्हणून सोन्याचा शर्ट बनवून घेतला होता. पुण्यात आधीच गोल्डमॅन आहेत. त्यात यानिमित्ताने आणखी एक भर पडली आहे.