पुणे- कोरेगाव-भीमा शौर्यदिनानिमित्त उद्या (बुधवार) विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून असंख्य भाविक विजयस्तंभावर गर्दी करू लागले आहे. सगळीकडे असलेल्या सुरक्षा व्यवस्थेमुळे, परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. उद्या दिवसभर नगर-पुणे हा महामार्ग बंद ठेवण्यात येणार असून, परिसरात इंटरनेटची सेवा देखील बंद ठेवण्यात येणार आहे.
शौर्यदिनानिमित्त मुंबई आणि नाशिकहून येणाऱ्या वाहनांना परत जाण्यासाठी तुळापूर-मरकळ-आळंदी मार्गे जावे लागणार आहे. तर, सोलापूर-पुणे-सातारा मार्गे येणारी वाहने वाघोली मार्गे येतील आणि जाताना लोणीकंद-केस्नंद-देऊ फाटा मार्गे सोलापूरकडे जाऊ शकतील. गेल्यावर्षी दुपारनंतर वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे, यावर्षी प्रशासनाकडून दोन स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आले आहे.
विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेची चांगली व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. या परिसरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ७४० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच, सोशल मीडियावरही पोलिसांची करडी नजर असणार आहे. टिक-टॉकचे २५ अकाउंट आणि फेसबुकचे १५ पेजेस बंद करण्यात आले असून सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरविणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. त्यामुळे, सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
शौर्यदिनासाठी जय्यत तयारी
कोरेगाव-भीमा येथे विजय स्तंभाला फुलमाळांनी सजवण्यात आले असून, संपूर्ण परिसरामध्ये अनुयायांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे. विजयस्तंभावर मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या अनुयायांच्या स्वागतासाठी विजयस्तंभ स्मारक समितीच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला असून, येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर, भाविकांच्या आरोग्य सेवेसाठी आरोग्य विभाग सज्ज आहे.
विजयस्तंभाला विविध रंगाच्या फुलांनी सजविण्यात आले असून, विद्युत रोषणाईने लखलखीत करण्यात आले आहे. त्यामुळे, या परिसरामध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण झाला असून याठिकाणी येणाऱ्या अनुयायांनी समाधान व्यक्त करत प्रशासनाच्या तयारीचे कौतुक केले आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी वाढणारी गर्दी लक्षात घेऊन स्मारक समिती असेल किंवा पोलीस प्रशासन यांच्या वतीने येणाऱ्या अनुयायांच्या स्वागतासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे स्मारक समिती अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी सांगितले.
हेही वाचा- देवाच्या आळंदीत मुबलक पाणी असतानाही महिलांचा पाण्यासाठी संघर्ष..