पुणे - पिंपरी-चिंचवडसह मावळ परिसरात पावसाचा जोर वाढल्याने नद्या, ओढे, दुथडी भरून वाहत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातून जाणारी पवना नदी तुडुंब भरली असून केजुबाई धरण आणि रावेत बंधारा देखील भरला आहे. त्यामुळे शहरातील नागरिक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी बंधाऱ्यालगत तसेच पवना नदीकाठी गर्दी करत आहेत.
दमदार पावसामुळे तालुक्यातील तिन्ही धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. वडीवडे ६४.९८ टक्के, आंद्रे ५८ टक्के तर पवना धरण २७ टक्के भरले आहे. पिंपरी चिंचवडसह मावळमध्ये पाऊस चांगलाच बरसला आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. दरम्यान, पवना नदी ही दुथडी भरून वाहत आहे. गेल्या काही दिवसांपासून मावळात मुसळधार पाऊस सुरू असल्याने काही गावांचा संपर्क तुटला आहे. तर काही ठिकाणी वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे.