पिंपरी-चिंचवड (पुणे) : संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ तालुक्यातील जनतेची तहान भागवणारे पवना धरण जवळपास 63 टक्के भरले आहे. यामुळे पिंपरी चिंचवड शहरावरील संभाव्य पाणी टंचाईचे संकट तूर्तास दूर झाले आहे. मागील 24 तासात धरणातील पाणीसाठ्यात 3.82 टक्के वाढ झाली आहे. पवना धरण परिसरात पावसाने जोर धरला असून धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. गेल्या चोवीस तासात धरण परिसरात 69 मिमी पाऊस झाला.
हेही वाचा - 'पाच वर्षे गृहखाते सांभाळणाऱ्या फडणवीसांनी मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवणे दुर्दैवी'
मागील वर्षी आजच्या तारखेपर्यंत पवना धरणात 96.63 टक्के इतका पाणीसाठा होता. धरण क्षेत्रात समाधानकारक पावसाला सुरूवात झाली आहे. यावर्षी आजपर्यंत एकूण 1 हजार 20 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 1 जुन पासून पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 27.36 टक्के वाढ झाली आहे. तर सध्या 62.65 टक्के पाणीसाठा झाल्याने पाणी कपातीचे विघ्न दूर झाले आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास धरण पुर्ण क्षमतेने भरण्यास फारवेळ लागणार नाही.
गेल्या वर्षीच्या तुलनेत पवना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी…
मावल परिसरात गेल्यावर्षी या वेळेपर्यंत पवना धरण तुडुंब भरले होते. परंतु, यावर्षी 62.65 टक्के इतका पाणी साठा धरणात उपलब्ध आहे. गेल्या 24 तासात 69 मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली असून यावर्षी आजतागायत 1 हजार 20 मिलिमीटर पाऊस झाला आहे. जो गेल्या वर्षीच्या तुलनेत फार कमी आहे. गेल्या वर्षी 15 ऑगस्टपर्यंत तब्बल 3 हजार 106 मिलिमीटर पाऊस पवना धरण पाणलोट क्षेत्रात झाला होता.