पुणे Pune News : पुणे शहरात दरवर्षी नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी पार्टीचं आयोजन केलं जातं. तसंच या पार्टीदरम्यान रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात साऊंड सुरू असतात. त्यामुळं जर गणेशोत्सवात सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळले जातात, तर यंदा नाताळ आणि 31 डिसेंबर रोजी देखील या आदेशांचं पालन व्हावं. तसंच रात्री बारावाजेनंतर सर्व प्रकारचे साऊंड्स बंद करण्यात. मात्र, जर असं झालं नाही तर पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाहेर भजन कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित करू, असा इशारा पतित पावन संघटनेकडून देण्यात आलाय.
पबमध्ये होणाऱ्या धिंगाण्याबाबत कोणीच बोलत नाही : यासंदर्भात पतित पावन संघटनेच्या वतीनं पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आलंय. याविषयी बोलत असताना पतित पावन संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील नाईक म्हणाले की, गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळांनी लावलेल्या साऊंडचा त्रास काही सुज्ञ मंडळींना झाला. तसंच विसर्जन मिरवणूकीविरोधात काहींनी न्यायालयात धाव घेतली. पण अशा या 25 डिसेंबर आणि 31 डिसेंबरला पबमध्ये चाललेल्या धिंगाण्याबाबत कोणीच काहीही बोलत नाहीय. कोणाचे पाल्य पबमध्ये जातात? सुज्ञ पुणेकर या विरोधात आवाज काढणार का? असा त्यांनी सवाल केला.
पुणे शहर ही सॅन्ताची नाही तर संतांची भूमी आहे. सर्वोच्च न्यायालयानं नियम फक्त हिंदू सणांसाठी लावलेत का?- स्वप्नील नाईक, अध्यक्ष, पतित पावन संघटना
पोलीस आयुक्तालयासमोर भजन आणि कीर्तन करणार : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरामध्ये 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर यादरम्यान कोणत्याही पब हॉटेल्स आणि पार्ट्यांमध्ये रात्री बारानंतर जर साऊंड वाजले तर पतित पावन संघटना पोलीस आयुक्तालयासमोर भजन आणि कीर्तन करणार आहे. असे निवेदन आम्ही पुण्याचे प्रभारी सह आयुक्त रामनाथ पोकळे तसंच पुणे जिल्हाधिकारी, पुणे विभागीय आयुक्त, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांना दिले आहे. यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त आपलं कर्तव्य बजावणार का? वारजेमध्ये न्यू इयर पार्टी होत असते. तसंच 31 डिसेंबरला रात्री नऊ वाजेपासून सकाळी एक जानेवारीला दहा वाजेपर्यंत साऊंड सुरू असतात. ही बाब आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलीय, असं देखील यावेळी नाईक म्हणाले.
हेही वाचा -