पुणे - देशाचे सीमेवर असलेल्या विविध प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी आपल्या सशस्त्र सैन्याने सज्ज राहावे, असे प्रतिपादन भारतीय हवाई दलाचे प्रमुख आरकेएस भदौरीया यांनी केले. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी उच्च पातळीवरील ज्ञान, समर्पण, वचनबद्धता आणि त्याग तसेच सर्व स्तरांवर नेतृत्व आवश्यक असल्याचेही भदौरीया यांनी सांगितले. ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 139 व्या तुकडीच्या दीक्षांत संचलन सोहळ्यात ते बोलत होते. या संचलनात 217 कॅडेट्सने सहभाग घेतला होता. एनडीएचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या या 217 कॅडेट्समध्ये 49 कॅडेट विज्ञान शाखा, 113 कॅडेट्स कॉम्प्युटर सायन्स तर 55 कॅडेट्स कला शाखेतून उत्तीर्ण झाले आहेत. तर यंदाच्या तुकडीत 12 कॅडेट्स हे मित्र राष्ट्रतील होते.
देशाच्या रक्षणासाठी सैन्यात भरती होणाऱ्या नवीन परीक्षणार्थींना उद्देशून पुढे बोलताना भदौरीया म्हणाले, की तुमच्याकडे उत्तम ज्ञान, समर्पण, वचनबद्धता आणि नेतृत्व करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. हेच तुमच्याकडून अपेक्षित आहे. सैन्यात तुम्ही नवीन असल्याने देशातील भौगोलिक परिस्थिती समजून घेणे गरजेचे आहे. जगभरातील राजकीय वातावरणाचा आपल्या देशाच्या सुरक्षेवर आणि वातावरणावर परीणाम होतो, याबद्दल तुम्ही जागरुक असणे अपेक्षित आहे, असेही भदौरीया म्हणाले.
'सूर्यकिरण'च्या हवाई कसरती
यंदाच्या दीक्षांत संचलन सोहळ्यात एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंग भदुरीया हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या संचलनात हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्सने तसेच सूर्यकिरण विमानांनी हवाई कसरती सादर केल्या. या तुकडीत कॅडेट अरक्षित कपूर याने विज्ञान शाखेत प्रथम येत कमांडट्स रौप्य पदक आणि चीफ ऑफ आर्मी स्टाफ ट्रॉफी पटकावली. तसेच कॅडेट परूल यादव याने कॉम्पुटर सायन्समध्ये प्रथम येत रौप्यपदक आणि चीफ ऑफ नेव्हल स्टाफ ट्रॉफी पटकावली. कॅडेट एडज्युटंट जसरोटीया याने कला शाखेमध्ये प्रथम येत रौप्यपदक आणि चीफ ऑफ एअर स्टाफ ट्रॉफी पटकावली.
एनडीए ही जगातील सर्वोत्कृष्ट अकॅडमी -
एनडीए ही जगातील सर्वोत्कृष्ट अकॅडमीपैकी एक आहे. युद्धभूमीवर योग्य प्रतिसाद आणि कामांमध्ये एकात्मिक समन्वयात्मक दृष्टीकोन साधणे गरजेचे असते, असेही भदौरीया म्हणाले. चीफ ऑफ़ डिफेन्स स्टाफ यांची नेमणूक आणि डीएमएची स्थापना ही आपल्या देशात उच्च संरक्षण सुधारणांच्या ऐतिहासिक टप्प्याची सुरुवात आहे. तुम्ही एनडीए नावाच्या उत्तम अकॅडमीत प्रशिक्षण घेतले असून यापुढे देशासाठी सेवा देत असताना आपण आपली भूमिका योग्यरीत्या पार पाडाल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा -केंद्र आणि राज्याच्या उपक्रमांमध्ये मराठीचा वापर बंधनकारक; भाषा विभागाने काढला जीआर
हेही वाचा -मराठा आरक्षण : अशोक चव्हाण यांनी घेतली नवी दिल्लीतील सरकारी वकिलांची भेट