पुणे- पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता साथरोग अधिनियमानुसार जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी याबाबतची माहिती दिली. गरज पडल्यास संचारबंदी देखील करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना बाधित देशातून येणारे प्रवासी, परदेशी नागरिक यांच्याबाबत दोन्ही शहरातील हॉटेल्स, टूर ऑपरेटर्स, लॉज, विश्रामगृहे यांनी माहिती देणे बंधनकारक असून शहरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते, असे देखील जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी साथ रोग अधिनियम लागू करण्यात आले आहे. मात्र, अद्याप संचारबंदी लागू झालेली नाही असे स्पष्ट करत आगामी काळात गरज पडल्यास त्याचीसुद्धा अंमलबजावणी करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा- 'एफटीआयआय'च्या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय चित्रपटसृष्टीचा चित्ररूपी इतिहास पाहण्याची संधी