पुणे - कोरोनाच्या महासंकटाचा प्रभाव अवघ्या जगात दिसून येत आहे. यामुळे हजारो जनांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तसेच अनेक जण हताश झाले आहेत. अनेकांना भविष्यात नेमके काय करायचे, असा प्रश्न पडला आहे. मात्र, जिल्ह्याच्या मावळ परिसरातील महिला शेतकरी रुपाली नितीन गायकवाड यांनी लॉकडाऊन ही सक्ती नसून संधी असल्याचे सिद्ध करून दाखवले आहे.
रूपाली यांनी कलिंगड आणि काकडीचे दुहेरी पीक घेत अवघ्या 30 गुंठ्यात तब्बल 5 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावलेला आहे. जिल्ह्यातील मावळ परिसर हा भाताचे पीक घेण्यासाठी प्रसिद्ध आहे. इतर पीक कोणी घेत नाही. शेतकरी महिला रुपाली यांनी अगोदर कलिंगडचे उत्पन्न घेतले. मात्र, कलिंगड विक्रीच्या काळात कोरोनाचे महासंकट आले. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले. या परिस्थितीतही रूपाली यांनी हार मानली नाही. लॉकडाऊनलाही त्यांनी एक सक्ती नाही तर संधी म्हणून पाहिले.
रुपाली यांनी शेताच्या बांधावर व्यापाऱ्यांना 15 रुपये किलोने कलिंगड विक्री केले. मात्र, त्या हताश झाल्या नाहीत. त्यांनी त्याच क्षेत्रात काकडीचे उत्पन्न घेतले. त्यांना 30 गुंठ्यात महिन्याकाठी दहा टन काकडीचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. सध्या त्यांना एका तोडणीला 800 ते 900 किलो काकडी मिळते आहे. महिन्याअखेर दहा टन काकडीचे उत्पन्न होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
रूपाली यांना 30 गुंठ्यात दुहेरी पिक घेत 1 लाख रुपये खर्च आला. यामाध्यमातून त्यांनी तब्बल 5 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. दुहेरी पिक घेतल्याने त्याचा फायदा होतो, असे रूपाली यांनी दाखवून दिले आहे.