पुणे- जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर व शिरूर तालुक्यात कांद्याचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. मात्र, यंदा कांद्याची बाजारातील आवक घटली आहे. त्यामुळे सध्या चाकण बाजारात कांद्याला प्रति किलो 70 ते 100 रुपयापर्यंत भाव मिळत आहे
उत्पादित केलेल्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळावा या हेतूने कांदा चाळीमध्ये साठवणूक केला जातो. लॉकडाउनच्याच्या काळात शेतकऱ्यांनी साठवणुकीत ठेवलेला कांदा विक्री केला. काही प्रमाणात शिल्लक राहिलेला कांदा सडून गेला आहे.
चाकण, मंचर, नारायणगाव, ओतूर आणि आळेफाटा बाजार समित्यांमध्ये कांद्याचे बाजारभाव कमालीचे वाढले आहे. या बाजार समित्यांमध्ये कांदा 100 रुपये प्रति किलोपर्यंत विक्री होऊ लागला आहे. सध्या, कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असला तरी अनेक दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
खरीप हंगामात लागवड केलेल्या कांदा पिकाचे परतीच्या पावसाने नुकसान झाले आहे. त्यामुळे पुढील काळात कांद्याचे उत्पादन घटून कांद्याचे बाजार भाव तेजीतच असल्याचे चाकण बाजार समितीतील आडतदार सांगत आहेत. त्यामुळे पुढील काळात कांद्याचे बाजारभाव असेच वाढीव राहिले तर चवीने कांदा खाणाऱ्यांना हा कांदा पुढील काळात तिखट लागणार आहे.