पुणे - पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव बसस्थानकाजवळ पीएमपीएमएल बसने दुचाकीला धडक दिली. यामध्ये एका तरुणीचा बसच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला. लक्ष्मी सुनील जंगम असे मृत तरुणीचे नाव आहे.

लक्ष्मी ४ दिवसांपूर्वीच जॉब सोडून नवीन ठिकाणी रुजू झाली होती. ती शुक्रवारी सकाळी आपल्या दुचाकीवरून कामावर जात होती. पिंपळे गुरव बस स्थानकाच्या वळणावर आली असताना तिला पीएमपीएमएलने धडक दिली. यामध्ये बसच्या मागील चाकाखाली येऊन तिचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी बस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मृत
लक्ष्मी ही विनाहल्मेट दुचाकी चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हेल्मेट असता, तर तिचा जीव वाचला असल्याची प्रतिक्रीया प्रत्यक्षदर्शींनी दिली. दुचाकी चालकांनी हेल्मेट वापरण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या सुरक्षेसाठी नाहीतर किमान आपल्या कुटुंबासाठी हेल्मेट वापरण्याचे आवाहन पोलिसांनी केले.