बारामती (पुणे) - बारामती तालुक्यातील सुपे येथे साखर वाहतूक करणारा मालवाहू ट्रक हॉटेलमध्ये घुसला. यात दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून अन्य तिघे जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत रुकसाना दिलावर काझी (वय 40 वर्षे) या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना चौफुला मोरगाव रस्त्यावरील सोंडवळण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वळणावर घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, रविवारी (दि.29 मे) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास बाराचाकी मालवाहू ट्रक ( एम. एच. 16 सी. सी. 6123 ) साखर घेऊन चौफुल्याकडून मोरगावच्या दिशेने निघाला असताना ट्रक चालक हनुमंत भालके (रा. निलंगा) हा दारूच्या नशेत होता, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. हा ट्रक पूजा मंगल कार्यालयाकडून भरधाव वेगाने आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून वळणावर उलटला आणि हॉटेलमध्ये घुसला. या अपघातात महिलेचा पती दिलावर इस्माईलभाई काझी (वय 50 वर्षे), मुलगा सोहेल दिलावर काझी ( वय 25 वर्षे, रा. सुपे, ता. बारामती ) हे जखमी झाले असून मुजाहीद अली अहमद अली सय्यद ( रा. बिजनौर, ता. धामपूर, उत्तर प्रदेश ) हे गंभीर जखमी झाले आहे.
रात्री उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते. अपघातग्रस्त ट्रक क्रेन व जेसीबीच्या साहयाने उचलण्यात आला. या अपघातात मृत झालेली महिला अपघातग्रस्त ट्रक खाली अडकली होती. या प्रकरणी युन्नूस इब्राहीम काझी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा अधिक तपास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
हेही वाचा - BMC Covid Scam Issue : पुरावे सादर केले नाही तर कारवाई करता येत नाही - अजित पवार