पिंपरी-चिंचवड (पुणे) - पोलीस आयुक्तालयाच्या वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचे अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना नुकतीच समोर आली असून यातील मुख्य सूत्रधारास वाकड पोलिसांनी अटक केली आहे. पैशांच्या व्यवहारातून तसेच मृत व्यक्तीने आरोपीच्या बहिणीचा विनयभंग केल्याच्या रागातून त्याने हे कृत्य केले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
संतोष शेषराव अंगरख (वय 42 वर्षे), असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. गणेश पवार, असे अटकेत असणाऱ्या मुख्यसूत्रधाराचे नाव आहे. दरम्यान, हा घटनेतील आणखी दोन आरोपींचा शोध वाकड पोलीस घेत आहेत. याप्रकरणी मृताचे वडील निवृत्त पोलीस कर्मचारी शेषराव रंगनाथ अंगरख (वय 63 वर्षे) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत संतोष याचे 16 ऑगस्टला मुख्यसूत्रधार गणेशने त्याच्या इतर दोन मित्रांच्या मदतीने अपहरण केले होते. पिंपरी-चिंचवड शहराजवळील कासारसाई येथे नेत त्याचा जेसेबीच्या सहाय्याने खून करण्यात आला आणि दहा फूट खोल खड्ड्यात त्याचा मृतदेह पुरण्यात आला.
दरम्यान, मुलगा अनेक दिवसांपासून घरी न आल्याने शेषराव अंगरख यांनी बेपत्ता असल्याची तक्रार वाकड पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत 2 सप्टेंबरला कासारसाई परिसरातून मृतदेह उकरुन काढला.
संतोषचा मृतदेह पुरल्याने छिन्नविछिन्न झाला होता. पोलिसांनी घटनेचा तपास करत याप्रकरणी गणेश सुभेदार पवार याला आरोपीला अटक केली होती. आरोपीने हा खून केला असल्याची कबुलीही दिली आहे. या गुन्हा सहभागी असलेल्या आणखी दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.
हेही वाचा - देशात सर्वाधिक गंभीर परिस्थिती पुण्यात - प्रकाश जावडेकर