पुणे - येथील पुणे-मुंबई द्रुतगतिमार्गावर आडोशी बोगद्याजवळ मुंबईच्या दिशेने जाणारा ऑइल टँकर उलटून अपघात झाला. ही घटना आज (सोमवारी) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली. सर्व ऑइल हे महामार्गावर पसरल्याने काही काळ एका दिशेची वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र, आता वाहतूक सुरळीत झाली आहे, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे.
भरधाव वेगात असलेल्या ऑइल टँकर आडोशी बोगद्याजवळ उलटून अपघात झाला. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही. मात्र, अवघ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर ऑइल सांडले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून द्रुतगती मार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक थांबविण्यात आली होती. खासगी लहान वाहनेही लोणावळा येथून जुन्या महामार्गावर वळविण्यात आली तर मोठी अवजड वाहने थांबविण्यात आल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितले.
टँकर अपघातामुळे लोणावळा शहरात अचानक वाहनांची गर्दी वाढल्याने गवळीवाडा नाका परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सुमारे तीन तासांपासून वाहतूक खोळंबल्याने मुंबई लेनवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. फायर ब्रिगेडच्या वाहनांतून रस्त्यावर पाणी मारत रस्ता धुण्याचे तसेच ऑइलवर माती टाकत चिकटपणा काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. दरम्यान, काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर पुन्हा वाहतूक सुरू करण्यात आली आहे.