पुणे - जिल्ह्यातील खेड पंचायत समितीमध्ये कामकाजाची माहिती घेण्यासाठी शाळकरी विद्यार्थी आले होते. यावेळी विद्यार्थ्यांकडून अधिकाऱ्यांना काही सोपे सोपे प्रश्न विचारण्यात आले होते. मात्र 'सर्व शिक्षा अभियान' म्हणजे काय? या प्रश्नाचेही उत्तर देऊ न शकलेल्या अधिकाऱ्यांकडून पंचायत समितीचे कामकाज कसे चालवले जाते, हा प्रश्न आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या योजना व कार्यालयीन कामकाज कशा पद्धतीने चालविलेले जाते, याचा अभ्यास करण्यासाठी राजगुरुनगर येथील 'के टी एस इंग्लिश मेडिअम स्कुल'चे विद्यार्थी खेड पंचायत समितीत आले होते. यावेळी विभागानुसार माहिती घेत, कार्यालयीन प्रमुखाशी संवाद साधत असताना मुलांनी काही प्रश्न विचारले. मात्र या प्रश्नांची उत्तरे देता न आल्याने अधिकाऱ्यांवर गप्प रहाण्याची वेळ आली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, बांधकाम, कृषी, महिला व बाल कल्याण, पशुसंवर्धन असे विविध विभाग चालविले जातात. या विभागांवर गट विकास आधिकारी, प्रशासकीय कार्यालय प्रमुख यांचे नियंत्रण असते. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रश्न उत्तराच्या फेरीत "सर्व शिक्षा अभियान" कसे चालविले जाते असा प्रश्न विचारला असता प्रशासकीय कार्यालयीन प्रमुखांनीच मला या प्रश्नाचे उत्तर येत नसुन, मला माफ करा असे सांगितले.
सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून शाळकरी मुलांना घडविण्यासाठी शिक्षण विभागामार्फत योजना राबविली जाते. मात्र या योजनेबाबत चक्क पंचायत समितीतील अधिकारीच अनभिज्ञ असल्याने, खेड पंचायत समितीच्या कामकाजावर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. गट विकास आधिकारी बाळासाहेब ढवळे यांनी मात्र आपल्या कार्यालयाची बाजु मारुन नेण्याचा केविलवाना प्रयत्न केला. परंतु त्यामुळे कार्यालयाचे वास्तव मात्र झाकता येणार नाही.