पुणे - बापू नायर टोळीतील गुंड निलेश बसवंत याने जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, बापू नायर टोळीतील कुविख्यात गुंड निलेश बसवंत (रा. अपर इंदिरानगर) याला पोलिसांनी २०१५ मध्ये खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केली होती. त्यानंतर दुर्धर आजारावर उपचारासाठी त्याने सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळविला होता. त्यानंतर निलेश १६ एप्रिल २०२० पासून जामीनवर आहे.
संशय आल्याने कागदपत्रांची पोलिसांकडून तपासणी
दरम्यान, निलेश बसवंत याने न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांबद्दल पोलिसांना संशय आला. त्यानुसार निलेशने न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांची पोलिसांनी तपासणी केली. त्याशिवाय खासगी दवाखान्यात भेट देऊन त्याच्या आजाराबाबतची माहिती घेतली. निलेशने सातारा येथील शेंद्रेतील डॉ. दत्तात्रय अंदुरे यांचे खोटे प्रमाणपत्र न्यायालयात सादर केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपीने शिवाजीनगर न्यायालयासोबतच सर्वोच्च न्यायालयात देखील जामीनासाठी अर्ज केला आहे. याठिकाणी देखील कागदपत्रे सादर केली आहेत. त्या कागदपत्रांची तपासणी केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.