पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात ९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून शहरातील कोरोनाबाधितांनी दोनशेचा आकडा पार केला आहे. त्यामुळे शहरातील बाधितांची संख्या २०४ वर पोहचली आहे. शहरात सहा जण कोरोनातून बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आत्तापर्यंत एकूण १२५ जण कोरोनातून बरे झाले आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी 9 जण कोरोनाबाधित आढळले होते. तर आज रविवारी देखील 9 जण कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे दोन दिवसात तब्बल १८ जण बाधित आढळल्याने शहरात चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आज दीड महिन्याच्या चिमुकल्यासह चार वर्षीय बाळाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर काल (शनिवारी) देखील ८१ वर्षीय आजोबांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे शहरातील कोरोनातून बरे झालेल्यांचा आकडा १२५ वर पोहचला आहे.
आज आढळलेले कोरोनाबाधित हे पिंपळे गुरव, संभाजीनगर चिंचवड, आनंदनगर चिंचवड स्थानक, दिघी, विकासनगर किवळे, मोरेवस्ती चिखली येथील रहिवासी आहेत. तर कोरोनातून बरे झालेले मोशी, चऱ्होली, रुपीनगर, संभाजी नगर चिंचवड आणि आनंदनगर चिंचवड स्थानक येथील आहेत.