पुणे - वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळा महाविद्यालये 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रात्री अकरानंतर शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पुण्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. विभागीय आयुक्त सौरव राव यांनी हा निर्णय जाहीर केला.
पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे -
कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट शोधून त्या ठिकाणी उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे.
राज्यातील कोरोनाची वाढती परिस्थिती पाहून पुणे शहर आणि जिल्ह्यातील शाळा महाविद्यालये 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. येत्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत यावर पुन्हा चर्चा केली जाईल.
खासगी शिकवणीचे वर्गही बंद राहतील.
उच्च शिक्षण देणारे वर्ग अर्ध्या क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी आहे.
शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट रात्री 11 वाजेपर्यंतच सुरू राहणार.
रात्री 11 पासून सकाळी 6 वाजेपर्यंत बाहेर फिरणाऱ्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.
लग्नसमारंभ, संमेलन, खासगी कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम यावर निर्बंध घालण्यात आले असून फक्त 200 लोकांना यात सहभागी होण्याची परवानगी असेल.
पोलिसांच्या परवानगीशिवाय कुठलाही लग्न समारंभ होणार नाही.