पुणे: अरबी समुद्रावरून होत असलेल्या बाष्पाच्या पुरवठ्यामुळे राज्यात आकाश ढगाळ होत आहे. ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. राज्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होण्यास सुरूवात झाली आहे. अचानक बदलेल्या वातावरणामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. औरंगाबाद, नगर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. येत्या 2 दिवसात देखील राज्यातील विविध ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे.
थंडीची लाट येण्याची शक्यता: उत्तर आणि पूर्व भागातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काल देखील राज्यातील काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली होती. पावसामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. पुढील दोन दिवस अशीच परिस्थिती असणार आहे. तर 29 जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता: 2 फेब्रुवारीपर्यंत ही थंडीची लाट कायम राहणार आहे. मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेसारखी परिस्थिती असणार आहे. तर मुंबईत किमान तापमान सरासरीपेक्षा कमी होऊ शकते, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले होते. पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता देखील वर्तवली होती. तसेच किमान तापमानात किरकोळ वाढ होईल. परंतु दिवसाच्या तापमानात अंशत: घट होण्याची शक्यता आहे. अशातच आता पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
आठवड्याचे हवामान कसे असेल? खरीप हंगामात आधीच अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सगळ्या आशा आता रब्बी हंगामातील पिकांवर आहेत. मात्र, हवामानातील बदलाचा रब्बी पिकांवर परिणाम होत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. एकूणच राज्यातील पुढील आठवड्याचे हवामान कसे असेल? याबाबत हवामान विभागाचे प्रमुख डॉ.अनुपम कश्यपी यांच्याशी संवाद साधला. 30 तारखेपर्यंत तापमानात कोणताही बदल होणार नाही. त्यानंतर तापमानात अंशिक वाढ होईल. 1,2,3 फेब्रुवारीला उत्तरेकडील हवा आपल्या भागात प्रवेश करेल, हे फेब्रुवारीमध्ये अपेक्षित आहे. रात्रीच्या तापमानात परत काही अंशिक घट होईल. राज्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने किमान तापमान ३ ते ४ अंशांनी वाढल्याची माहिती हवामानतज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हेही वाचा: Weekly Horoscope : कसा असेल तुमचा हा आठवडा? जाणून घ्या आचार्य पी खुराणा यांच्याकडून...