पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधितांच्या संख्येने शंभरी ओलांडली असून आज(मंगळवार) १० जणांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. यात रुपीनगरसह इतर परिसरातील व्यक्तींचा समावेश आहे. दरम्यान, शहरातील एकूण संख्या १०६ वर पोहोचली आहे. आतापर्यंत तब्बल २९ जण ठणठणीत बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, दुसरीकडे आकडेवारी वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या तीन दिवसात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा १०६ वर पोहोचला आहे. आतापर्यंत २९ जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर, चार जणांचा मृत्यू झालेला आहे. सोमवारी दिवसभरात तब्बल ११ जण कोरोनाबाधित आढळले होते. यापैकी, काही रुपीनगर परिसरातील असून आज त्या ठिकाणच्या परिसरातील व्यक्ती आढळले असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
शहरात १६ ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे. त्याची अमंलबजावणी मध्यरात्रीपासून सुरू झाली आहे. यात ज्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत, त्या परिसराचा समावेश आहे.
कंटेनमेंट झोन खालीलप्रमाणे -
खराळवाडी परिसर, पीएमटी चौक भोसरी, गुरुदत्त कॉलनी परिसर भोसरी, रामराज्य प्लॅनेट परिसर कासारवाडी, गणेश नगर परिसर दापोडी, शास्त्री चौक परिसर भोसरी, संभाजीनगर परिसर आकुर्डी, रोडे हॉस्पिटल परिसर दिघी, तनिष्क ऑर्किड परिसर चऱ्होली, कृष्णराज कॉलनी परिसर पिंपळे गुरव, नेहरूनगर बस डेपो परिसर भोसरी, कावेरी नगर पोलीस लाईन परिसर वाकड, रुपीनगर परिसर तळवडे, फातिमा मशीद गंधर्वनगरी परिसर मोशी, विजयनगर परिसर दिघी, आदिनाथ नगर परिसर भोसरी.