पुणे - पूरग्रस्तांना मदतीची जशी गरज आहे तशीच त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही तितकेच गरजेचे आहे. याचीच दखल घेत सोमवारी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या ६० डॉक्टरांची ६ पथके पूरग्रस्तांवर उपचार करण्यासाठी सांगली कोल्हापूरकडे रवाना झाली आहेत.
सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पूरग्रस्त सांगली, सातारा भागाला भेट देत पूरग्रस्तांशी संवाद साधला होता. त्याचवेळी शरद पवार यांनी सरकारला जास्तीत जास्त मदत करण्याचे आवाहनही केले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पूरग्रस्तांच्या आरोग्याची काळजी म्हणून राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या ६० डॉक्टरांची १०-१० अशी ६ पथके, ६ रुग्णवाहिका आणि पुरेसा औषधसाठा घेवून रवाना झाली आहेत. याशिवाय या टीममध्ये त्या त्या भागातील तज्ज्ञ डॉक्टर देखील सहभागी होणार आहेत. सोमवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत डॉक्टर सेलची ६० डॉक्टरांची ६ पथके सांगली, कोल्हापूर, सातारा आणि कोकणात रवाना झाली आहेत.