पुणे: चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणूकीचे राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपकडून लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी जगताप, बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तशी तयारी जगताप कुटुंब करत आहे. मात्र, आता थेट भावकिनेच जगताप कुटुंबाला आव्हान दिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे तीन जानेवारी रोजी दुर्धर आजराने निधन झाले. त्यामुळेच आता चिंचवड पोटनिवडणूक लागली आहे. एकीकडे भाजपाच्याकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप किंवा आमदारांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. तशी तयारी जगताप कुटुंब करत असून आढावा बैठका सुरू केल्या आहेत.
राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्याची इच्छा: दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी भावकीच्या राजकारणात उडी घेतली आहे. पोटनिवडणूकीसाठी ते इच्छुक आहेत. तशी तयारी त्यांनी सुरू केली आहे. दिवंगत लक्ष्मण जगतापांच्या तालमीत तयार झालेले राजेंद्र जगताप यांनी उमेदवारी अर्ज देखील आणला आहे. ही निवडणूक लढवण्याची आणि ती जिंकण्याची ताकद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. चिंचवड मतदारसंघाचा त्यांचा अभ्यास चांगला आहे. जगतापांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपळे गुरव, जुनी सांगवी, नवी सांगवी परिसरात राजेंद्र जगतापांची बऱ्यापैकी ताकद आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु, पक्षश्रेष्ठी होकार देणार का नाही? हे देखील पाहावे लागणार आहे.
स्वतंत्र राजकिय कारकीर्द घडविण्यास सुरुवात: १९९५- ९६ चे नाट्यगृहाचे आरक्षण प्रलंबित होते. प्रकरण कोर्टापर्यंत गेले. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी लक्ष घालून पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त राजीव जाधव यांना निदर्शनास आणून दिले. त्यानंतर त्याच जागेत आज निळूभाऊ नाट्यगृह उभारले गेले आहे. या नावाला विरोधकांचा विरोध होता. परंतु, 'ड' प्रभाग च्या क्षेत्रीय कार्यालयीन बैठकीत दिवंगत जेष्ठ अभिनेते निळूभाऊ फुले यांचे नाव देण्याचा ठराव झाला. दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या खांद्याला खांदा लावून राजेंद्र जगताप यांनी काम केले. परंतु, त्यांना नगरसेवक व्यतिरिक्त कुठेच पद मिळाले नाही. यामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला आणि त्यांनी स्वतंत्र राजकिय कारकीर्द घडविण्यास सुरुवात केली.