पुणे - अजित पवारांची भाजपशी असलेली जवळीक पुन्हा समोर आली आहे. आमदार संजय शिंदे यांच्या मुलाच्या लग्नात अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकमेकांच्या बाजुला बसलेले दिसले. या भेटीबाबत अजित पवार यांना पत्रकारांनी छेडले असता, आमच्यात हवा पाण्यावर चर्चा झाल्याचे पवारांनी मिश्कीलपणे सांगितले.
यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना, देवेंद्र फडणवीस आणि माझी बैठक व्यवस्था आयोजकांनी एकमेकांच्या बाजूला केली; आणि हा निव्वळ योगायोग असल्याचे पवार म्हणाले. तसेच राजकारणात कोणीच कायमचा शत्रू नसतो, असे सांगून संजय शिंदे यांच्या आग्रहामुळे कार्यक्रमाला उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले. फडणवीसांशी फक्त 'पाऊस-पाणी ठिक ना', याच विषयावर चर्चा झाल्याचे पवार म्हणाले.
हेही वाचा - सरकारने हिंदू-मुस्लिम फाळणी केली आहे; शिवसेनेचा अग्रलेखातून भाजपवर निशाणा
रविवार (0८ डिसेंबर)ला अजित पवार बारामतीचा नियोजित दौरा रद्द करून मुंबईला गेले होते. यांनतर पुन्हा बारामतीत आल्यानंतर त्यांनी संजय शिंदे यांच्या मुलाच्या लग्नाला उपस्थिती लावली.
हेही वाचा - नवी दिल्ली: आयात केलेल्या कांद्याची बाजारपेठेत आवक; घाऊक बाजारात किमती उतरणीला
अजित पवारांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी बारामतीकरांची आहे. या प्रश्नानर बोलताना, उपमुख्यमंत्रीपदाबद्दल निर्णय तिन्ही पक्षातील वरिष्ठांकडून घेतला जाईल, असे पवार यांनी सांगितले. सध्या बारामतीकरांनी माझ्यावर 165 चा बोजा टाकला आहे; त्यामुळे आता केवळ काम करत राहणे हेच कर्तव्य असल्याचे त्यांनी म्हटले. मंत्रिमंडळ विस्तार व सिंचन प्रकरणी मिळालेली क्लिनचीट याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याचे त्यांनी टाळले.