पुणे : राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार आज (शुक्रवारी) पुणे दौऱ्यावर असून बारामती हॉस्टेल येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी खासदार गिरीश बापट यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या घरच्यांची सांत्वना देखील केली. मी काल नाशिक दौऱ्यावर होतो. काल माहिती घेतली आणि तिथल्या जनतेला आव्हान केले आहे की, अशा प्रमाणे दंगल कोणी घडवून आणण्याच्या प्रयत्न करत असेल तर त्याला कोणीही खतपाणी घालू नये. शांतता ठेवली पाहिजे. तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवता कामा नये, असे आवाहन पवारांनी केले.
कार्यक्रम व्हायला पाहिजे: महाविकास आघाडीकडून छत्रपती संभाजी नगर येथे सभा घेण्यात येणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता ती सभा रद्द करण्यात यावी का? असा अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, ही सभा महाविकास आघाडीची आहे. एकटा अजित पवार या बाबत निर्णय घेत नाही. इतर नेते देखील निर्णय घेणार आहे. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे देखील तयारी करत आहे आणि जर सभा नाही झाली तर जास्तच वातावरण खराब झालं की काय अशी चर्चा होईल. त्यामुळे ठरलेले कार्यक्रम व्हायला पाहिजे असे मला वाटत आहे, असे यावेळी अजित पवार म्हणाले.
कोण नरेश म्हस्के? शिवसेना नेते शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी अजित पवार यांच्यावर आरोप केले आहेत की, एमसीसीएच्या निवडणुकीत रोहित पवार यांना पाडायचे होते यावर अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, कोण नरेश म्हस्के? मी ओळखत नाही त्यांना असल्या स्टेटमेंट करणाऱ्या मी महत्त्व देत नाही. आम्ही असे घरामध्ये पण वागत नाही. जी माझी भूमिका असते तीच भूमिका माझी कायम असते. रोहित पवार माझ्या कुटुंबातील एक घटक आहे. तो माझा पुतण्या आहे. तो मला माझ्या मुलासारखा आहे, असे यावेळी अजित पवार म्हणाले.
सावरकर सन्मान रॅलीविषयी पवार म्हणाले...: राहुल गांधी यांनी जे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबतीत जे विधान केले आहे. त्या विरोधात भाजप सावरकर सन्मान रॅली काढणार आहे. यावर पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, आमचे मत आहे की राष्ट्रीय महापुरुषांचा आदर केला पाहिजे. समाजात वातावरण दूषित होऊ नये. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करण्याचे काम तेव्हाचे राज्यपाल, भाजप नेते यांनी केले होते. गौरव यात्रा काढणे हा तुमचा अधिकार आहे. पण ज्योतिबा फुले, महाराज यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यावर कोणी काही बोललं तेव्हा का मूक गिळून बसले होते? महागाई आणि बेरोजगारी विचलित करण्यासाठी ही यात्रा असावी असे यावेळी पवार म्हणाले.
हेही वाचा: Milk Price Hike : दुधाचे दर आणखी वाढण्याची शक्यता, दुधाचे दर का वाढतात रे भाऊ?